लतीफ शेख यांचा आर्थिक अनियमिततेचा आरोप
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या विकासकामांतील निधीवाटप आणि टँकर खरेदीच्या प्रस्तावावरून नवा वाद निर्माण झाला आहे. टँकर खरेदीसाठी प्रस्तावित खर्च आणि शासकीय पोर्टलवरील दरांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप नगरसेवक लतीफ शेख यांनी केला आहे. तसेच, 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च होऊनही संबंधित कामांचा तपशीलवार हिशोब आणि पुरावे प्रशासनाकडे आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
नगरसेवक लतीफ शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल महापालिकेकडून 20 पाण्याच्या टँकरच्या खरेदीसाठी प्रति टँकर 47 ते 48 लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. दुसरीकडे, शासकीय पोर्टलवर 1,000 ते 10,000 लिटर क्षमतेचे टँकर सुमारे 23 ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध असल्याचा त्यांचा दावा आहे. या दोन दरांची तुलना करता प्रति टँकर 22 ते 25 लाख रुपयांपर्यंत तफावत असल्याचे शेख यांनी निदर्शनास आणले. मात्र, टँकरची क्षमता, तांत्रिक वैशिष्ट्ये, उपकरणे, कर आणि देखभाल यांसारख्या बाबींची तुलना केल्यानंतरच प्रत्यक्ष दरातील तफावत स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे या खरेदी प्रस्तावाची तांत्रिक व आर्थिक तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, महापालिकेच्या विकासकामांवर 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च झाला असतानाही कोणत्या कामासाठी किती रक्कम खर्च करण्यात आली, याचा ठोस हिशोब प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचा आरोप शेख यांनी केला. महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन या दोघांनीही नागरिकांच्या पैशांच्या खर्चाबाबत पारदर्शकता ठेवून जनतेला उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.







