प्रवासी वहनचालकांची गैरसोय
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट झाली आहे. त्यातच मागील अनेक वर्षे येथील बलाप येथून जाणारा बाह्यवळण मार्ग प्रलंबित आहे. परिणामी प्रवासी, वाहनचालक व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असल्याने नेहमीच येथे भाविकांची गर्दी असते. पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. परिणामी, अनेक लोक कामानिमित्त येत असतात. पालीतील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. बल्लाळेश्वर मंदिर, ग.बा. वडेर हायस्कूल, जुने एसटी स्टँड, गांधी चौक, बाजारपेठ, मारुती मंदिर अशा अनेक ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही नाक्यांवर वाहतूक पोलीस तैनात असूनदेखील अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, एकेरी वाहतुकीवरुन दुहेरी वाहतूक आणि वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्याने व रस्त्याच्या दुतर्फात अवैधरित्या पार्क केलेली वाहने त्यामुळे पोलिसांना या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते.
अनेक वेळा वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहचण्यास उशीर होतो. संध्याकाळनंतर मात्र बर्याच वेळा वाहतूक पोलीस तैनात नसतात. तर, अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ते नसतात. आणि, यावेळीसुद्धा बर्याच वेळा वाहतूक कोंडी होते.
- पाली बाह्यवळण मार्ग लवकर होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे पालीतील वाहतूक कोंडीचा प्रश्नदेखील मार्गी लागेल. दिशादर्शक फलक तसेच अवैध पार्किंग करू नये, यासंबंधी ठिकठिकाणी फलकदेखील लावले आहेत. – दिलीप रायण्णावार, प्रशासक, पाली नगरपंचायत तथा तहसीलदार सुधागड
वाहनांची वर्दळ
मुंबई-गोवा महामार्गाचे संथ गतीने सुरु असलेले व अपूर्ण काम यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मुंबईवरुन कोकणाकडे जाणारे प्रवासी पालीतून विळेमार्गे माणगाववरुन किंवा वाकणवरुन पुढे जातात. तर, कोकणाकडून येणारी वाहने माणगाववरुन विळेमार्गे पालीतून खोपोलीमार्गे पुणे-मुंबईकडे जातात. परिणामी, पालीत वाहनांची वर्दळ वाढून अधिक वाहतूक कोंडी होते. बाह्यवळण मार्ग निर्माण झाल्यास ही वाहने पालीच्या बाहेरुनच निघून जातील, त्यामुळे ही वाहतूक सुरळीत होऊ शकते.
ब्राह्यवळण मार्ग
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर बलाप गावावरुन थेट बल्लाळेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाप गावाजवळ हा बाह्यवळण मार्ग काढण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाची मंजुरीदेखील मिळाली आहे. जमीन संपादनदेखील झाली आहे. परंतु, हा पर्यायी मार्ग अजूनही लालफितीत अडकला आहे.