कर्जतमधील विद्यार्थीनींना सायकल भेट
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील महिला मंडळ संस्थेच्या विद्या विकास मंदिर शाळेत शिकणार्या विद्यार्थिनी या दूरवरून शाळेत येत असतात. यामुळे त्या मुलींसाठी शाळेत ये-जा करण्यासाठी सायकली देण्यात याव्यात अशी इच्छा कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका माधवी ठाकूर देसाई यांच्याकडे करण्यात आली होती. यानुसार माधवी ठाकूर देसाई आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून शाळेतील 15 विद्यार्थिनींना देण्यात आल्या.
कर्जत महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर या शाळेत एका नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांचा विचार करता घर ते शाळेतील अंतर कमी करण्यासाठी संस्थेने कल्याणच्या बिर्ला कॉलेजच्या प्रोफेसर माधवी ठाकूर देसाई यांच्याकडे आपली समस्या मांडली होती. देसाई यांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींसोबत तात्काळ संपर्क साधून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 15 सायकलींची व्यवस्था करून दिली. या सायकली लेखक अच्युत गोडबोले तसेच अंथनी फर्नांडिस, धनंजय मदन आणि त्यांचे सहकारी सायकल वीर, अभिनय घाग, प्रवीण देशपांडे, प्रसाद कर्वे यांच्या उपस्थितीत देण्यात आल्या.
यावेळी लेखक अच्युत गोडबोले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, आपल्या मनातील प्रत्येक समस्या आणि शंका या आपल्या शिक्षकांना विचारून त्यांचे निरसन करण्यासाठी सतत पुढाकार घेतला पाहिजे. तसेच, आपल्या मनातील विषयांना कागदावर उतरवले पाहिजे. यातून एखादा चांगला लेखक रायगडला मिळेल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मंडळ संस्थेच्या कार्याध्यक्ष मीना प्रभावळकर यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा गाढे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी शोभना गोडबोले, दिपाली केसकर, संस्थेच्या उपाध्यक्षा वैदेही पुरोहित, सदस्या श्रीमती पूजा सुळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा मुंडेकर यांनी केले.