| रोहा | प्रतिनिधी |
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्यावतीने यशवंतखार व सानेगाव आदिवासी वाडीवरील मुलांना कपडे वाटप करण्यात आले. दिवाळीत वाडी-वस्तीवर गोड कार्यक्रम पार पडल्याने आदिवासी समाजातील मुलांच्या चेहऱ्यांवर आनंदाचे क्षण दिसून आले. या आयोजित छोटेखानी कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष विजय दिवकर व माजी अध्यक्ष मयूर दिवेकर म्हणाले की, आज समाजातील दीन दुबळ्या लोकांना कपडे वाटप करण्यात आले. तसेच, या गोड उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील गरीब लोकांची देखील दिवाळी गोड जावी, हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचे माजी अध्यक्ष मयुर दिवेकर व विद्यमान अध्यक्ष विजय दिवकर यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. अमरदिप क्लोथ सेंटरचे मालक विकास जैन यांनी या कार्यक्रमासाठी कपडे उपलब्ध करून दिले. तसेच, मयुर दिवेकर यांच्यावतीने दोन्ही वाड्यांवर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उटणे, साबण वाटप केले.





