| तळा | प्रतिनिधी |
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कृषी संलग्न प्रात्यक्षिक कार्यक्रमाअंतर्गत तळा तालुक्यातील 15 शेतकऱ्यांना रोहु, कटला व सायप्रिन या जातींच्या मत्स्यबीजांचे वितरण करण्यात आले. प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यास एक हंडी याप्रमाणे मत्स्यबीजांचे वाटप करण्यात आले. मत्स्यबीजांचे वितरण तळा तालुका पंचायत समितीचे सभापती नथुराम मुकण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, मंडळ कृषी अधिकारी संजय घालमे, सहाय्यक कृषी अधिकारी संदीप साळुंखे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सचिन लोखंडे तसेच तालुक्यातील लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मत्स्यपालन हा शेतीला पूरक, कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्यपालन करून शेततळे, सिंचन तलाव व इतर जलस्रोतांचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन मत्स्यपालन व्यवसायाचा विस्तार करण्याचेही आवाहन करण्यात आले. मत्स्यपालनामुळे शेतीबरोबरच अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो. कृषी व मत्स्यपालन यांचा समन्वय साधल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. तसेच ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात, असे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकऱ्यांना मत्स्यबीजांचे वाटप
