। रोहा । प्रतिनिधी ।
दिव्यांगांना प्रेरणा मिळावी म्हणून जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधत हेल्पर्स ऑफ दी हॅण्डीकॅप तर्फे दिव्यांगांना कानाचे मशीन वितरित करण्याचे आयोजन रोहा शासकीय विश्राम गृहात करण्यात आले होते. रोह्यात अपंग पुनर्वसन संस्थेचे काम करणार्या रोशन अमोल देशमुख व त्यांच्या सहकार्यानी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी 100 दिव्यांगांना कानाचे मशीन उपलब्ध करून देण्यात आले.
अपंग पुनर्वसन संस्थेच्या रोशन अमोल देशमुख यांच्या प्रयत्नांतुन हेल्पर्स ऑफ दी हॅण्डीकॅप, युवक प्रतिष्ठाण आणि लायन्स क्लबच्या सहभागातून या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड.मनोजकुमार शिंदे, मिलिंद अष्टीवकर, प्रदीप आप्पा देशमुख, शैलेश रावकर, मिलन शाह, शशिकांत मोरे, रोशन अमोल देशमुख, प्रशांत देशमुख, अमोल देशमुख, समिधा अष्टीवकर आदींसह रायगड जिल्ह्यातील दिव्यांग सदस्य उपस्थीत होते. या कार्यक्रमासाठी भाजपाचे नेते नील सोमय्या व किरीट सोमय्या यांनी 100 कर्णबधीर लोकांना शंभर कानाच्या मशीन दिल्या. या कार्यक्रमात ज्या दिव्यांगांनी परिस्थितीवर मात करत शिक्षण, कला व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली अश्या दिव्यांगांचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कोरोना काळात दिव्यांगांना रोहा तालुक्यातील विविध संस्था, लायन्स क्लब ऑफ रोहा, उपजिल्हा रुग्णालय रोहा, सुदर्शन केमिकल रोहा, पंचायत समिती रोहा, रोहा अष्टमी नगरपरिषद, तालुका वैद्यकीय विभाग या विभागातील अधिकार्यांना सन्मानित करण्यात आले. अपंगावर मात करण्यासाठी सोहम देशमुख यांनी शस्त्रक्रीया केली व चांगल्या पध्दतीचा प्रतिसाद दिल्याने अश्या सोहम देशामुखचा आदर्श इतरांनी घेऊन आपण चांगले होण्याचा प्रयत्न करू हाच हेतू आहे. अपंगावर मात करत सतीश सहदेव भोईर याने बी. ए. बीएड शिक्षण घेतले त्याचा सन्मान करण्यात आला.







