जंगम कुटुंबियांनी जपली सामाजिक बांधिलकी
| चौल | प्रतिनिधी |
निसर्ग संवर्धन व त्याचे जतन व्हावे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला याची जाणीव व्हावी. निसर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी कायमच प्रयत्नशील राहावे. यासाठी अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील रहिवासी सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या उद्योजक सुनील जंगम आणि कुटुंबियांनी पर्यावरणाप्रती सामाजिक बांधिलकी जोपासत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कडुनिंबाची झाडे भेट दिली.

यावेळी सुनील जंगम यांची कन्या अवनीने सांगितले की, कोरोना संसर्गजन्य काळात सर्वाधिक गरज भासली ती ऑक्सिजनची. प्रत्येकानं जर आपलं कर्तव्य समजून एक झाड ते मोठं केलं असतं, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. भविष्यात ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, याकरिता आम्ही ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यानुसार दरवर्षी 500 रोपांचे वाटप करण्याचा संकल्प केल्याचे ती म्हणाली. या उपक्रमाची सुरुवात देशाच्या स्वातंत्र्यदिनी करण्यात आली. अलिबाग येथील चिंतामरणराव केळकर विद्यालयात 50 झाडांचे भेट देण्यात आली. संचालक अमर वार्डेंनी या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच रेवदंडा येथील तेंडुलकर विद्यालयात 50 झाडे आणि चौलमळा येथील प्राथमिक शाळा आणि ग्रामस्थांना 50 हून अधिक कडुनिंबाची झाडे भेट देण्यात आली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनंत पाटील यांनी जंगम कुटुंबियांच्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले. चौलमळा गावचे गावप्रमुख रवींद्र घरत यांनीसुद्धा जंगम कुटुंबियांचे आभार मानले. समाजाप्रति दाखविलेले दायित्व कौतुकास पात्र असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी जंगम कुटुंबियातील सुनील जंगम, सौ. जंगम आणि त्यांच्या कन्या अवनी व उर्वी, गावचे उपप्रमुख जितेंद्र पाटील, खजिनदार अल्पेश घरत, शाळा समितीचे उपाध्यक्ष अनिल नाईक, विनायक थळकर, किशोर घरत, निलेश घरत, शैलेश नाईक, अनंत म्हात्रे आदींसह शाळेच्या शिक्षिका, चौलमळा ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.