कर्तृत्ववान महिला इतरांसाठीही प्रेरणादायी ः उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
चूल आणि मुल या मानसिकतेतून बाहेर पडून महिलांनी आज स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ही ओळख त्यांच्यासाठी महत्वाची आहे. अशा कर्तृत्ववान महिला इतरांसाठीही प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी व्यक्त केले. त्या अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून दिल्या जाणार्या तेजस्विनी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होत्या.
आदर्श पतसंस्थेच्या सभागृहात सोमवारी पार पडला. यावेळी जिल्ह्यातील पाच कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला रायगडच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस अधिक्षक किर्ती शेडगे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे, आदर्श पतसंस्थेच्या संचालिका वर्षा शेठ, पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील आणि अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांच्या उपस्थितीत होते. त्यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्या महिलांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी महिलांना शिवणकामाचे धडे देऊन स्वावलंबी बनविणार्या रेखा प्रभाकर मोरे, गणेशमूर्ती कार्यशाळा चालविणार्या सपना अमोल जाधव, चाकोरीच्या बाहेर जाऊन साऊण्ड सर्विस व्यवसायात जम बसवणार्या स्नेहा गणेश कादू, रायगडची महिला क्रिकेटपटू श्रुती संतोष अडीत आणि दुध व्यवसाय करून घराचा चरीतार्थ चालविणार्या वर्षा साखरकर यांना तेजस्विनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.