सामान्य गृहिणी ते फॅशन डिझायनरपर्यंतचा प्रवास
। अलिबाग । वर्षा मेहता ।
8 मार्च म्हणजेच महिला दिन आला की, महिलांचा गौरव केला जातो. तो त्या दिवसापुरता मर्यादित नसावा, अशी ओरडही प्रत्येकवेळी ऐकायला मिळते. बेटी म्हणजे धनाची पेटी असे म्हटले जाते. ही बेटी आता आपल्या विचारांमुळे, स्वातंत्र्यामुळे आर्थिक नियोजनाची आणखी उंच भरारी घेताना दिसत आहे. अशाच एका गृह लक्ष्मीने घेतलेली आर्थिक भरारी, अलिबागचेच नाही तर सार्याच महिलांसाठी अभिमानास्पद कामगिरी करणार्या लक्ष्मी शंकर मुकादम यांच्यासोबत केलेल्या गप्पा मांडण्याचा प्रयत्न.
कमावत्या हाताला आपल्या कष्टाची जाण ठेवत, संपत्तीची बचत विचारपूर्वक व काटकसर करत भविष्याची तजवीज करण्याचे, आर्थिक नियोजनाचे माप निसर्गाने महिलांच्या पारड्यात जरा जास्तच टाकले आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. याच उक्तीप्रमाणे लक्ष्मी शंकर मुकादम यांनी सर्व रूढी, परंपरा आणि अडथळे बाजुला सारुन अनेकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते. हे त्यांनी त्यांच्या कार्यातून समाजाला दाखवून दिले आणि वयाच्या 49 व्या वर्षी त्या फॅशन डिझायनर बनल्या.
या व्यवसायात कसं आणि कधी येण्याच ठरवलं यावर बोलताना लक्ष्मी यांनी सांगितले, माझे शिक्षण तेलगू भाषेत झाले. सातवीत असताना शाळा सोडली. नंतर स्थानिक माध्यमातून शिक्षण घेतल्याने इतर शाळेत प्रवेश मिळाला नाही; परंतु मला इतर गोष्टींची आवड होती. मी ब्युटी पार्लर, मेहंदीचे कोर्स केले व त्यातून पैसे मिळवायला सुरुवात केली. पुढे 1991 मध्ये लग्न करुन अलिबागमध्ये आले. त्यानंतर कौटुंबिक जीवनाला सुरुवात झाली. मला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुले आहेत. लग्नानंतर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीसाठी नवर्याकडे किंवा कुटूंबियांकडे पैसे मागणे खटकत होते. शेवटी मनाशी निश्चय केला. आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचं आणि तेव्हा मला साथ दिली ती शिलाई मशीनने!
माज्या घरी शिलाई मशीन होती पण मी कुठलाही टेलरिंगचा कोर्स केला नसून देखील टेलरिंगला सुरुवात केली. 1995 मध्ये तेव्हा सुरुवातीला मी खूप चुका केल्या. पण त्यातून मी शिकत गेले. जिद्द होती आणि मला थांबायचे नव्हते. मी 30 रुपये शिलाईने सुरुवात केली. माझ्या मनात एकच गोष्ट होती की, मला ते करायचे आहे, मला कमवायचे आहे! भविष्यात फॅशन डिझाईनिंगच्या क्षेत्रात अलिबागमध्ये स्वतःचे बुटीक सुरु करायचे आहे. जेणेकरून येथील नागरिकांना डिझायनर कपढे खरेदी करण्यासाठी मुंबईला जावे लागणार नाही आणि त्यांना त्यांच्या बजेटमध्ये उत्तम वर-वधूचे कपडे उपलब्ध होतील.
मुलींना मोफत टेलरिंगचे शिक्षण
या व्यवसायात मुलांनी आणि नवर्याने खूप साथ दिली. कधीही कोणत्या गोष्टीची तक्रार नाही केली. आज 25 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. या काळात मी टेलर ते फॅशन डिझायनरचा प्रवास केला. या कालावधीत मी सुमारे 100 गरजू मुलींना मोफत टेलरिंग शिकवले. सुरवातीला 15 दिवसांचे क्लासेसचे आयोजन करायची. आता मला अनेक ठिकाणी विशेष पाहुणे, वक्ता म्हणून बोलावतात. मुंबई, पुणे येथे ग्राहक आहेत. बरेच सेलिब्रिटी कलाकारही माझ्याकडे येतात. फोटोग्राफर्सही कपडे भाड्याने घेण्यासाठी तर काही खरेदी करतात.
महिलांना विशेष संदेश
कौटुंबिक किंवा इतर कोणत्याही कारणास्तव स्वत:ला मागे ठेवणार्या महिलांनी कोणाशीही स्पर्धा करू नका. तुम्ही जे काही करता त्यात तुमचे सर्वोत्तम द्या. शेवटी तुमचे काम तुमच्या बाजूने बोलेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे करायचे आहे ते स्वप्न पहा. स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही खासियत असते, गरज आहे ती फक्त ओळखण्याची, त्यावर काम करण्याची आणि स्वत:ची ओळख निर्माण करण्याची गरज आहे.
अलिबागच्या कलाकारांची साथ
या व्यवसायात अलिबागचे कलाकार अमोल कापसे, अमित वैद्य यांनी माझी कला लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता अलिबाग लायन्स क्लब फॅशन शो सारखं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. तेव्हापासून अलिबागमध्ये आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात माझी ओळख निर्माण झाली. तसेच 2021 मध्ये मला मिस्टर/मिसेस/मिस स्टारलेटमध्ये विशेष अतिथी म्हणून बोलावले.