भाजीपाला किटचे वाटप; 164 हेक्टर क्षेत्रावर लागवड
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
तालुक्यातील रब्बी क्षेत्र वाढविण्याच्यादृष्टीने केलेला प्रयत्न, भाजीपाला किटचे वाटप आणि दिलेले प्रोत्साहन यामुळे शेतकर्यांच्या स्वयंरोजगाराला कृषी विभागाचे बळ मिळत आहे. त्यामुळे रब्बी हंगामात शेती, पर्यटन आधारे आर्थिक विकासाची वाट तालुक्यासाठी महत्त्वाची ठरत आहे.
भाजीपाला, शेतीपूरक उद्योग, पर्यटन यातून शेतकरी आपले पाय रोवू पाहात आहेत. कृषी विभागामार्फत हरभरा, मूग, मसूर आदी भाजीपाला लागवड किटचे एकूण 45 हेक्टरसाठी वाटप करण्यात आले आहे. तसेच, स्थानिक वाणअंतर्गत वाल व पावटा यांचाही समावेश आहे. 2023-24 मध्ये 120 हेक्टरवर लागवड करणारा तालुका 2024-25 मध्ये 44 टक्क्यांनी वाढ होऊन 164 हेक्टरवर पोहोचला आहे. यामध्ये वडवली, शिस्ते, बोर्लीपंचतन, चिखलप आदी परिसरातील गावांचादेखील समावेश आहे.
शेतीआधारित उत्पादनांवर प्रक्रिया करणार्या उद्योगांचे जाळे उभे राहण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर अनेक प्रयोग यशस्वी होऊ लागले आहेत. त्यात आंबा, काजू, फणस, कोकम, करवंद या कोकणी फळांवर प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक उद्योजक पुढाकार घेत आहेत. तर, कृषी विभागाकडून कडधान्यांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच, फवारणीसाठी औषधे देण्यात आली आहेत. यामुळे रब्बी हंगामात रोजगाराचे साधन टिकून राहात आहे, असे वडवली येथील शेतकरी गणेश कांबळे यांनी सांगितले.
कृषी विभागाकडून दिल्या जाणार्या विविध योजनांचा व आयोजित केल्या जाणार्या प्रशिक्षणांचा व प्रात्यक्षिकांचा लाभ घ्यावा. सेंद्रिय शेती करू इच्छिणार्या शेतकर्यांनी सेंद्रिय शेती योजनांचा लाभ घ्यावा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
– श्रद्धा किरण डुंबरे, तालुका कृषी अधिकारी, श्रीवर्धन