। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदान सात मे रोजी होणार आहे. अर्ज भरण्यापासून मतमोजणी होईपर्यंतची प्रक्रिया सुरळीत पार पाहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. या कालावधीत सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरविणार्यांवर करडी नजर राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 16) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे आदी उपस्थित होते.
रायगड लोकसभा मतदारसंघात 16 लाख 53 हजार 935 मतदार आहेत. यामध्ये पुरुष आठ लाख 13 हजार 515, महिला आठ लाख 40 हजार 416, तृतीय पंथी चार, दिव्यांग आठ हजार 46, 85 वयोगटापेक्षा 31 हजार 28, तर 18 ते 19 वयोगटातील 16 हजार 288 मतदारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल असणार असून, अर्जाची छाननी 20 एप्रिल रोजी केली जाणार आहे. अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया 22 एप्रिल असून, त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात दोन हजार 185 मतदान केंद्रे आहेत. त्यात सहा संवेदनशील मतदान केंद्र आहेत. मतदान सात मे रोजी होणार असून, मतमोजणी चार जूनला होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
समितीच्या मार्फत राहणार नजर रायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड या चार विधानसभा तसेच गुहागर, दापोली या रत्नागिरीतील दोन विधानसभांचा समावेश आहे. ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी 22 विविध समित्या तयार करण्यात आल्या आहेत. मतदारांना आमिष दाखविणारे, आचारसंहितेचा भंग करणार्या गुंडगिरी करणार्यांवरदेखील समितीच्या माध्यमातून लक्ष दिले जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी 13 हजार 470 कर्मचार्यांचा समावेश असणार आहे.
दिव्यांग, ज्येष्ठांना घरीही करता येणार मतदान मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी 85 वर्षांवरील व्यक्तीच्या घरी जाऊन मतदान करून घेतले जाणार आहे. त्यासाठी 12 डीचा अर्ज मतदारांकडून भरून घेतला जाणार आहे. तसेच, दिव्यांगासाठी ही व्यवस्था केली जाणार आहे. मतदान केंद्रात मतदान करणार्या दिव्यांगासाठी व्हील चेअरची व्यवस्था केली जाणार असल्याचे जावळे म्हणाले.
रायगड पोलीस सज्ज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस दलाने गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरु केली आहे. वेगवेगळ्या पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचे याबाबत प्रशिक्षण घेण्यात आले आहे. ही प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यााठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मतदारांवर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकणारे, सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. तसेच, परवाना शस्त्रधारकांचे शस्त्रदेखील जप्त केले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
