जनगणनेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

| अलिबाग | प्रतिनिधी |

भारत सरकारच्या निर्देशानुसार आगामी जनगणना 2027 साठी रायगड जिल्हा प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली असून, यावेळी पहिल्यांदाच मोबाईल ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने माहिती संकलन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा प्रधान जिल्हा जनगणना अधिकारी किशन जावळे यांनी दिली.

देशाच्या इतिहासातील ही 16 वी तर स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना असणार आहे. जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार असून, पहिला टप्पा घरयादी व घरगणना या स्वरूपात 1 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या टप्प्यात 1 मे ते 15 मेदरम्यान नागरिकांना https://se.census.gov.in या संकेतस्थळावरून Self-Enumeration द्वारे स्वतःची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे. त्यानंतर प्रगणकांकडून प्रत्यक्ष भेटी देऊन मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलन केले जाणार आहे. दुसरा टप्पा प्रत्यक्ष जनगणना स्वरूपात फेब्रुवारी 2027 मध्ये होणार आहे.

जनगणना मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 15 तहसीलदार, 16 मुख्याधिकारी तसेच पनवेल महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना 4 ते 6 मार्च 2026 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे प्रशिक्षण देण्यात आले. रायगड जिल्ह्यासाठी 69 क्षेत्रीय प्रशिक्षक (Field Trainers) नियुक्त करण्यात आले असून, हे प्रशिक्षक तालुका व नगरपालिका स्तरावरील 5 हजार 98 प्रगणक आणि 863 पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. तसेच जिल्ह्याचे मास्टर ट्रेनर प्रकाश संकपाळ, उपविभागीय अधिकारी कर्जत, तसेच समन्वय अधिकारी हरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल महिन्यात प्रशिक्षण सत्रे पार पडली. जनगणनेदरम्यान विचारली जाणारी वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय आदी माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून, ती केवळ सांख्यिकीय व विकास नियोजनासाठीच वापरली जाणार आहे.

जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवून अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.

किशन जावळे,
जिल्हाधिकारी
Exit mobile version