काँग्रेस नेत्याचा बॅनरवर पक्ष प्रवेशाचा फोटो व्हायरल केल्याने हसे
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मोठा गाजावाजा करीत रामराज विभागात बंडखोर आमदाराच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या शिंदे गटाच्या पक्षप्रवेश सोहळ्यात आठवडाभर आधीपासून तालुक्यातील एका काँग्रेस नेत्याचे बॅनरवर फोटो लावून तसेच सोशल मिडीयावर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पसरविला जात होता. प्रत्यक्षात मात्र सदर नेत्याने या कार्यक्रमात प्रवेश केला नसल्याने अलिबाग तालुक्यात मोठे हसे होत आहे. तसेच या कार्यक्रमात जिल्हा प्रमुख राजा केणी यांना बंडखोर आमदार दळवी यांनी बोलायची संधी न देता त्यांच्यापेक्षा कमी महत्वाचे असणारे पदाधिकारी यांना बोलण्याची संधी देण्यात आली. या प्रकारामुळे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या शिंदे गटातील कारकिर्दीला उतरती कला लागल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसत आहे. थेट जिल्हा प्रमुखालाच फाटयावर मारुन बंडखोर आमदार दळवी यांनी त्यांना चाप लावल्याचेही बोलले जात आहे.
राजा केणी यांना नाईलाज म्हणून जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांना आवरणे कठीण बनले होते. त्यामुळे त्यांना चाप लावण्यासाठीच ही कृती केल्याची चर्चा शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसत आहे. या बैठकीपासूनच राजा केणी यांना डावलण्यास सुरुवात करण्यात आल्याचे दिसून आले. मनोगत व्यक्त करण्यासाठी रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे, माजी जि.प. सदस्य मानसी दळवी, तेलगे यांना बोलण्याची संधी देण्यात आली. मात्र ठरवून राजा केणी यांना दुर ठेवण्यात आले. यातून जिल्हा प्रमुख पद असले तरी त्यांचे शिंदे गटात तालुकाप्रमुखा पेक्षाही कमी महत्व असल्याचे बिंबवण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.
याच कार्यक्रमाची बॅनरबाजी करताना तालुक्यातील काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांचे छायाचित्र शेअर केले जात होते. मात्र प्रत्यक्षात या पक्ष प्रवेश कार्यक्रमात गोंधळी यांचा प्रवेश झाला नसल्याचे शिंदे गटातील सावळा गोंधळ समोर आला. या प्रकारामुळे अनेक व्हाटस् ग्रुपमधून शिंदे गटाच्या बॅनरची खिल्ली उडविण्यात येत होती.