कबड्डी स्पर्धेला भेट,आयोजकांचे कौतूक
| नागाव | हिरामण भोईर |
रायगड जिल्ह्यात आजपर्यंत अनेक दिग्गज कबड्डीपटू निर्माण झाले आहेत. भविष्यातही असेच कबड्डीपटू तयार होण्यासाठी आवश्यक ती साधनसुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी बुधवारी (30 नोव्हेंबर) नागाव येथे दिली. तसेच नागाव येथे अत्याधुनिक क्रीडा संकूल उभारण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
नागाव येथे निखिल मयेकर मित्र मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हा अजिंक्यपद तसेच निवड चाचणी स्पर्धेला आ.जयंत पाटील यांनी भेट देऊन आयोजिकांचे तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे कौतूक केले. रायगडच्या इतिहासात प्रथमच असे भव्यदिव सामने आयोजित केल्याबद्दल त्यांनी आयोजक निखिल मयेकर मित्र मंडळाचे कौतूक केले.
कबड्डीच्या इतिहासात रायगडचा संघ महाराष्ट्रात अव्वल मानला जातो. रायगडच्या कबड्डीपटूंनी केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवर ठसा उमटविला आहे, असे ते म्हणाले.
या स्पर्धेतून निवडल्या जाणार्या संघासाठी पंधरा दिवस सराव शिबीर आयोजित केले जाणार असल्याचेही जयंत पाटील यांनी जाहीर केले. रायगडातील कबड्डीपटूंसाठी नागाव येथे अत्याधुनिक क्रीडासंकूल उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. रायगडातील कबड्डी संघांना मॅट मिळावी अशी आपण सरकारकडे मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
या स्पर्धेमुळे नागावकरांनी एक वेगळी सुरुवात केलेली आहे. पुढील वर्षी यापेक्षा जास्त कबड्डीप्रेमी सहभागी होतील अशी व्यवस्था करावी, अशी सुचनाही त्यांनी आयोजकांना केली. खेळाडूंबरोबरच पंच,समीक्षकांची चांगली सोय केल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. कबड्डी महर्षि बुवा साळवी यांचेही त्यांनी आवर्जून स्मरण केले.
दरम्यान, आ.अनिकेत तटकरे यांनीही स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच आयोजकांना धन्यवाद दिले.
कोणत्याही दबावाला बळी न पडता चांगला खेळ दाखविणार्या खेळाडूंमधूनच रायगडचा संघ निवडला जावा. रायगड जिल्ह्यात कबड्डी संघटना राजकारण विरहित काम करीत आहे.
आ. जयंत पाटील
संघात निवड होणार्या सर्व खेळाडूंना माझ्या शुभेच्छा.
शेकाप सरचिटणीस