। वावोशी । वार्ताहर ।
रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कर्नाळा ग्रामपंचायत अंतर्गत बानुबाई वाडीला प्रत्यक्ष भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समस्या जावळे यांनी जाणून घेतल्या. सोमवारी (दि.7) झालेल्या या दौर्यात त्यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी करत संबंधित अधिकार्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.
यावेळी पीएम जन मन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुल कामाची पाहणी करून एकही कुटुंब घरकुलापासून वंचित राहता कामा नये, अशा शब्दांत जिल्हाधिकार्यांनी संबंधित अधिकार्यांना ठोस निर्देश दिले आहे. याशिवाय पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, अंगणवाडीची इमारत, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आदी समस्या ग्रामस्थांनी मांडल्या. या सर्व समस्या लवकरच मार्गी लावल्या जातील, असा दिलासा देत जावळे यांनी ग्रामस्थांसाठी रोजगाराभिमुख योजनांचा आराखडा तयार करण्याचाही आदेश अधिकार्यांना दिला आहे. तसेच, व्हिडिओ कॉन्फरन्सपेक्षा प्रत्यक्ष संवाद अधिक समाधानकारक आहे. तुमच्या घरकुलांचे काम पूर्ण झाल्यावर मी पुन्हा या वाडीत येणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.