। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जतचे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव व महसूल अधिकारी यांच्याकडून सोमवारी रात्री लाल मातीची तस्करी करणार्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत त्यांना लाखोंचा दंड लावण्यात आला आहे. मात्र, त्याचवेळी तहसीलदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असून कारवाईत आढळून आलेल्या सात रिकाम्या असलेल्या हायवा ट्रकवर महसूल विभाग करणार आहे की नाही? असा प्रश्न राजकीय पुढार्यांच्या येरझर्यांमुळे निर्माण झाला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे लाल माती तस्करी करणार्यांचे धाबे दणाणले असून, रिकामे ट्रक गायब झाल्याने महसूल विभागाचे टेन्शन वाढले आहे.
या कारावाई नंतर महसूल अधिकारी चिमटे वाडी येथे पोहचले असता त्याच भागातील मोहोपाडा ते बळीवरे गावाच्या हद्दीत एक हायवा ट्रक माती भरून जंगलात उभा ठेवून चालक पळून गेला होता. त्या ट्रकच्या चालकांनी मंगळवारी पहाटे पाच वाजता त्याठिकाणाहून आपल्या गाड्या काढून नेरळ मार्गे पनवेलकडे नेलेल्या आहेत. या सर्व गाड्यांचे नंबर महसूल विभागाकडे असून त्याची व्हिडीओ शूटिंग देखील महसूल विभागाकडे आहे. त्यामुळे त्या सर्व गाड्यांना अभय देण्यासाठी कर्जत तालुक्यातील राजकीय पुढारी तहसीलदारांकडे फिरकू लागले आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनावर दबाव वाढला असून प्रशासन नक्की कोणती कारवाई, करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, त्या प्रत्येक गाडीला साधारण 2 लाख 40 हजाराचा दंड बसण्याची शक्यता असल्याचे समजत आहे.
लाल माती घेवून जाणार्या ट्रक वर लक्ष्य ठेवण्यासाठी कर्जत चारफाटा येथे सीसीटिव्ही कॅमेरे आणि गस्ती साठी नियोजन केले आहे.त्याचवेळी सरप्राइज व्हिजीट महसूल विभागाकडून दिल्या जातील.
डॉ. धनंजय जाधव,
तहसीलदार, कर्जत