जिल्हाधिकाऱ्यांची कार्यालयांना भेट

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी कर्मचाऱ्यांशी हितगुज करीत त्यांची आसन व्यवस्था पाहत, दैनदिन कामाबाबत चर्चा करीत येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. दरम्यान कार्यालयात स्वच्छतेवर भर द्या असेही अवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखा, निवडणूक शाखा, नोंदणी शाखा, अस्थापना शाखा, गृहशाखा, कुळ व वहीवाट शाखा, खनिकर्म,लेखा, महसूल, पुनर्वसन शाखा, करमणूक कर शाखा, भुसंपादन शाखा, भुमी अभिलेख , नियोजन विभागात भेट देऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्थेची तपासणी केली. कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत लवकरच त्यांचा निपटारा करण्यात येणार असल्याचे अश्वासन दिले.

आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन त्यांचा लेखा-जोखा तपासण्यात आला. कार्यालयाच्या परिसरातील बाहय स्वच्छता तात्काळ करुन घ्यावी, असेही यावेळी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा प्रशासन अधिकारी नगर विकास शाखा शाम कोशेट्टी, जिल्हा चिटणीस चंद्रसेन पवार, पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे आदी उपस्थित होते.

Exit mobile version