जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज

। अलिबाग । वार्ताहर ।
मान्सून सुरू झाला आहे. गेली दोन वर्ष जिल्ह्याने अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाची जय्यत तयारी सुरू आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये सज्ज राहून कोणतीही जीवितहानी व अन्य कोणतीही हानी होणार नाही, यासाठी दक्ष राहण्याचा जिल्हा प्रशासनाने निश्‍चय केला आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, नवी मुंबई परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, रोहा उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, इतर सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांचीही उत्कृष्ठ साथ मिळत आहे.

मान्सूनपूर्व तयारीचा आढावा दि.17 जून रोजी प्रभारी उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्या समन्वयातून जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक महाडमध्ये संपन्न झाली. या बैठकीदरम्यान महाडमधील पूराच्या व दरडप्रवण क्षेत्राच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजना व सुरू असलेली तयारी यांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, उप विभागीय पोलिस अधिकारी निलेश तांबे,महादेव रोडगे, श्री.पोळ, श्री.बुरले, सागर पाठक यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित असलेल्या विषयांचे विस्तृत सादरीकरण केले. जिल्हा परिषदेद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात बांबू लागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच शाळा कॉलेज व इतर शासकीय व अशासकीय संस्थांद्वारे तसेच सामाजिक वनीकरण विभागाद्वारे मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीचे नियोजन आहे.

Exit mobile version