शुक्रवारी जिल्हास्तरीय कृषी मेळावा

। नांदगाव । वार्ताहर ।
सध्याच्या हवामान बदलामुळे, नैसर्गिक वादळांसारख्या आस्मानी संकटांमुळे शेतकर्‍यांवर आलेल्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन होण्यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक महासंघाच्यावतीने मुरुड तालुक्यातील यशवंतनगर पंचक्रोशीत एका भव्य जिल्हा कृषी मेळाव्याचे शुक्रवारी (दि.24) आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे संयोजक तथा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यशवंतनगर येथिल उसरोली टेपावर असलेल्या आगरी समाज सभागृहात हा जिल्हास्तरीय कृषी मेळावा सकाळी दहा वाजता होणार आहे.
सदर मेळाव्यात शेतकर्‍यांना लॉकडाऊनमुळे विक्री व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने ठोस विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तसेच यावेळी युपीएल कंपनीच्यावतीने खते, किटकनाशके व अन्य उत्पादनांबाबत सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील कृषी फलोत्पादन क्षेत्रातील प्रयोगशील शेतकर्‍यांनाही मेळाव्यात सन्मानित करण्यात येणार आहे. तरी कोरोनाचे सर्व नियम पाळून या मेळाव्याला शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहनही मोकल यांनी केले आहे.

Exit mobile version