आंबेवाडी, नवनाथ आकांक्षा दुसर्या फेरीत
| मुंबई | प्रतिनिधी |
आंबेवाडी मंडळ, नवनाथ क्रीडा, आकांक्षा मंडळ यांनी चारचौघी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या पुरुष द्वितीय श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसर्या फेरीत प्रवेश केला. ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे सुरू असलेल्या पुरुष द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेच्या चुरशीच्या सामन्यात आंबेवाडी क्रीडा मंडळाने संस्कृती प्रतिष्ठानला 32-29 असे नमविले. विश्रांतीला 19-13 अशी आघाडी घेणार्या आंबेवाडीला नंतर मात्र संस्कृतीने शर्थीची झुंज दिली. धनंजय निजामपूरकर, हिमांशू राऊत आंबेवाडीकडून, तर संस्कृतीकडून दर्शन एल्गार, साई गुप्ता उत्कृष्ट खेळले.
दुसर्या सामन्यात नवनाथ क्रीडा मंडळाने ओम् श्रीसाईनाथ सेवा ट्रस्टला 28-21 असे चालविले. पहिल्या सत्रात 14-07 अशी आश्वासक आघाडी घेणार्या नवनाथला दुसर्या सत्रात श्री साईनाथने चांगलेच जेरीस आणले. पण वेळेचे गणित हुकल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. अभिषेक नलावडे, सिद्धेश कदम नवनाथच्या विजयाचे शिल्पकार ठरले. साईनाथच्या अनिकेत सावंत, सूरज आगटे यांनी दुसर्या सत्रात आपला खेळ गतिमान करीत सामन्यात रंगत आणली. शेवटच्या सामन्यात आकांक्षा क्रीडा मंडळाने दादोजी कोंडदेव स्पोर्ट्सला 40-33 असे नमविले. अफताब पठाण, उत्कर्ष पेयर आकांक्षा कडून, तर प्रभात पाटील, अमर कदम दादोजी कोंडदेव कडून उत्तम खेळले.