| नागपूर | प्रतिनिधी |
लंडन येथे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड टीम ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरच्या आंतरराष्ट्रीय मास्टर आणि वुमन ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यात तिने जगातील महिला बुद्धिबळातील अव्वल क्रमांकावरील खेळाडू हाऊ यिफान हिला पराभूत केले. या विजयानंतर दिव्याचे नाव केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण बुद्धिबळविश्वात उंचावले आहे.
ही लढत तब्बल 74 चालींपर्यंत रंगली. सुरुवातीला दोन्ही खेळाडू समसमान ताकदीने खेळत होत्या, मात्र, अंतिम टप्प्यात हाऊ यिफान हिने तिच्या राजा-बिशपच्या संरचनेत एक चूक केली आणि तिने नेमकी संधी साधत सामना जिंकला. दिव्या हेक्झामाईंड चेस क्लब या संघाकडून खेळत होती. ब्लिट्झ विभागात दिव्याने आठपैकी सहा सामने जिंकले तर एक सामना तिने बरोबरीत राखला आणि केवळ एक सामना गमावला. तिचे प्रदर्शन रेटिंग 2606 इतके प्रभावी ठरले. या कामगिरीच्या जोरावर तिच्या संघाने उज्बेकिस्तानला 3.5; 2.5 अशा फरकाने पराभूत करत ब्लिट्झ टीम कांस्य पदक पटकावलं. तिच्या या ऐतिहासिक विजयाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिने 2024 मध्ये अंडर-20 महिला जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकून आधीच आपल्या नावावर एक मोठे यश नोंदवले होते. तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना पदके पटकावली आहेत.