छ. शिवाजी मंडळाच्या रंगावली प्रदर्शनाचा शुभारंभ
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील पाटील आळीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी मंडळाचे हे चोपन्नावे वर्ष आहे. या कालावधीत मंडळाने अनेक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचा वारसा जपला आहे. गेल्या 48 वर्षांपासून मंडळाच्या वतीने दीपावलीच्या दिवसांत रंगावली प्रर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे 49 वे वर्ष आहे. उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे हाच मंडळाचा हेतू आहे.
मंडळाच्या सभागृहात रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष गजानन गुरव, माजी अध्यक्ष दत्तात्रय म्हसे, सचिव अरुण विशे, विठ्ठल जाधव, किशोर शेलार, पंछि गुप्ता, हरिश्चंद्र राऊत, जयवंत म्हसे, राजू मोरे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत दत्तात्रेय म्हसे यांनी केले.
या प्रदर्शनात चित्रकार किसन खंडोरी यांनी सिंधुताई सकपाळ, राजेंद्र दगडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सविता शेलवले कीर्तनकार बाबामहाराज सातारकर, स्वप्ना पाटील यांनी उद्योगपती रतन टाटा, प्रियांका भासे यांनी आ. महेंद्र थोरवे, आलिशा जैन यांनी आयुषमान खुराणा, मनोज चव्हाण यांनी लता मंगेशकर व मनोज जरांगे, आशिष गायकवाड यांनी अमिताभ बच्चन, तनहा परदेशी यांनी गौतम बुद्ध, सुनील परदेशी यांनी लावणी कलावंत, कुणाल साळवी यांनी बागेश्वर, तसेच किसन खंडोरी, राजेंद्र दगडे या सुप्रसिद्ध रंगवलीकारांसह मानसी सुळे, सुश्मिता सुळे आदी नवोदित कलाकारांनीही विविध विषयांवरील रांगोळ्या साकारून प्रदर्शनात जिवंतपणा आणला आहे. याप्रसंगी नितीन गुप्ता, विजय पाटील, दीपक जाधव आदींसह रंगावली कलाकार उपस्थित होते.