अडगळीच्या सामानातून मोठा फायदा
। पनवेल । वार्ताहर ।
देशात दिवाळी हा सण जोरात साजरा होत असतो. या करता न चुकता घराची साफसफाई आणि रंगरंगोटी करण्यात येत असते. अशा वेळी वापरात नसलेले टाकऊ सामान भंगार विक्रेत्याला विकून काही पैसे खिशात टाकून घेण्याला पसंती दिली जाते. याचा फायदा भंगार सामान खरेदी करणार्या विक्रेत्यांना होत असून या विक्रेत्यांचीदेखील दिवाळी जोरात साजरी होत आहे.
दिवाळी सणाला अनेकजण नवीन साहित्य खरेदी करण्याला पसंती देत असतात. यामध्ये सोने, नवीन वाहन, इलेक्ट्रॉनिक्स सामान, फर्निचर, भांडी, विविध प्रकारच्या शोभवंत वस्तू यांचा समावेश असतो. कालांतराने यापैकी बरेच सामान वापराता येत नसल्याने आडगळीत टाकले जाते. इतर वेळी अडगळीत टाकलेल्या या साहित्या कडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, दिवाळीत करण्यात येणार्या साफसफाई वेळी हे साहित्य बाहेर काढले जाते. यातील टाकाऊ सामान भंगार खरेदी करणार्या विक्रेत्यांना विकण्यासाठी नेले जाते. भंगार खरेदी करणारे विक्रेतेदेखील भंगारात आलेल्या वस्तूंच्या किंमतीनुसार दर देऊन आलेल्या ग्रहकाला खुश करत असतात. यामुळे ग्राहक आणि विके्रता या दोघांची दिवाळी जोरात साजरी होते.
विक्रेत्यांना फायदा
भंगारात खरेदी केलेले साहित्य विक्रेते पुढे मोठ्या व्यापार्याकडे विक्रीसाठी पाठवत असतात. यातून भंगार खरेदी करणार्या छोट्या विक्रेत्यांना देखील मोठा आर्थिक फायदा होत असतो. दिवाळीत हे प्रमाण जास्त असल्याची माहिती एका भंगार विक्रेत्याने सांगितली आहे.
अनेकजण भंगार म्हणून सगळ्याच प्रकारचे टाकाऊ साहित्य घेऊन येतात. आम्हीदेखील ग्राहकाला नाराज न करता भंगारात विकले जाऊ शकत नसलेले थोडेफार सामान विकत घेत असतो.
– विनोद सोळंकी, भंगार विक्रेता