दिवाळी सणाच्या लगबगीला वेग!

आकर्षक आकाशकंदिलांनी सजली बाजारपेठ

| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |

दिवाळीचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाच्या पार्श्‍वभूमीवर वेंगुर्ला बाजारपेठेत विक्रीस दाखल झालेले विविध रंगाचे आकर्षक आकाशकंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. काही विक्रेत्यांनी या आकाशकंदिलांमध्ये विद्युत प्रवाह सोडल्याने ठिकठिकाणी दिवाळी सणाचा माहोल पहायला मिळत आहे. तर विविध पणत्या, मेणबत्या, रंगीबेरंगी रांगोळ्या, रांगोळ्यांचे साचे विक्रीस उपलब्ध झाले आहेत.

गणेश चतुर्थीच्या सणानंतर दिवाळी सणाच्यानिमित्ताने विविध साहित्यांनी पुन्हा एकदा बाजारपेठ सजली आहे. सर्वत्र या सणाच्या पूर्वतयारीसाठीची लगबग वाढली आहे. अलीकडे नरकचतुर्दशी दिवशी नकरासुराच्या प्रतिमा दहन करण्याची ‘क्रेझ’ वाढली आहे. त्यामुळे नवरात्रौत्सवानंतर युवावर्गासोबत लहान मुलेही नरकासुराची भव्यदिव्य प्रतिमा करण्यात गुंतले आहेत. तर काही मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बनविण्याचा वसा घेतल्याने सर्वांना विविध किल्ले पहाता येणार आहे. युवावर्गाच्या आणि मुलांच्या हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पर्धांचे आयोजन केले आहे. आपला नरकासूर तसेच आपण बनविलेला शिवाजी महाराजांचा किल्ला स्पर्धेमध्ये अव्वल ठरावा यासाठी तरूणाई आणि लहान मुले रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
दिवाळी सणामध्ये लहान-मोठे दुकानदार आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात. त्या पार्श्‍वभूमीवर काही दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या स्वच्छतेला आणि रंगरंगोटीला सुरूवात केली आहे. तर काही व्यापारी आपल्या नवीन व्यवसायाचा शुभारंभ दिवाळीच्या शुभमुहूर्ताला करणार आहेत. दिवाळी सणाची लगबग अंगणातल्या तुळशी वृंदावनापासून ते स्वयंपाकगृहापर्यंत पोहोचली आहे.

दिवाळी म्हटली की, फराळ हा मुख्य मानला जातो. महागाई कितीही वाढली तरी फराळामध्ये काही कमी पडू नये याकडे महिलावर्गांचा कल असतो. धावपळीच्या जीवनात रेडीमेड फराळ घेण्याकडे कल वाढलेला दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन शॉपिंगद्वारे स्थानिक उत्पादित फराळ अगदी मुंबईसारख्या मोठ्या शहरात पाठविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. एकंदरीतच, सर्वत्र दिवाळी सणाची लगबग सुरू झाली आहे. सण कधी एकदा सुरू होतो आणि उत्साहात साजरा करण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Exit mobile version