| उरण । वार्ताहर ।
दिवाळी म्हटले की आपल्यासमोर चटकन फटाके , पणत्या आकाशकंदील येतात. यंदा उरण बाजारपेठेत विविध नावीन्यपूर्ण आकाशकंदील दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी बाजारपेठेत चायनामेड वस्तूंचा बोलबाला दिसून येतो. मात्र यंदा स्वदेशी बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य देतांना पर्यावरणपुरक आकाशकंदिलांना मागणी आहे. त्यात हंडी कंदील प्रकारात फ्लोरोसंट हंडी, मेटॉलिक हंडी हे प्रकार उपलब्ध आहेत. पॉल, मेटॅलिक, रंगीबेरंगी कापडी व कागदी कंदील, हॅलोग्राफी कंदील, मार्बल पेपर कंदील, वेताचा वापर केलेले कंदील, फोल्डिंगचे कंदील, साडीचे आणि खणाचे आकाशकंदील यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. महागाईचे सावट दीपावली सजावटीच्या वस्तूंवरही दिसून येत आहे. आकाशकंदीलचे भावही 25 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत.
पालीत आकर्षक आकाश कंदील
पाली बाजारपेठ दिवाळी निमित्त सुशोभित आकाश कंदील, पणत्या, रांगोळी, फटाके यांनी बहरून गेली आहे. पालीतील श्री छत्रपती संभाजी महाराज चौक येथील सेलिब्रेशन फायर क्रेकर्स या दुकानात माफक दरात फटाके ,पणत्या,आकाश कंदील, रांगोळी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. तरी सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे बच्चे कंपनी दिवाळीच्या खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेली नाही पुढील दोन दिवसानंतर बाजारपेठा गजबजून जातील असे निलेश खोडागळे यांनी कृषीवलला सांगितले.
दीपावलीसाठी बाजारपेठ सजली
दीपावली सणाच्या खरेदीसाठी रोहा-कोलाड बाजारपेठा हळूहळू ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. बाजारात खरेदीसाठी येणार्या ग्राहकांची आपल्या दुकानाला पहिली पसंती मिळावी यासाठी दुकानदारानीही आपापली दुकाने विविध प्रकारे सजवून ठेवली आहेत. तर किराणा सामान, फटाक्यांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फुलवाले,कटलरी दुकाने, कपड्याची दुकाने, मिठाईची दुकाने, गृहपयोगी वस्तूंची दुकाने आदी दुकानात ग्राहकांची विशेष गर्दी दिसून येत आहे.शेती क्षेत्राला परतीच्या पावसाचा बसत असलेला फटका व अद्याप भाताचे एकही कणीस शेतकरी वर्गाने कापले नसल्याने ऐन दीपावलीचे तोंडावर शेतकरी वर्गासमोर मोठेच संकट उभे राहिले असल्र्याचे एकंदरीत परिस्थितीवरुन दिसून येत आहे.