सेल्फीसाठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका

एमएसआरडीसीचे वाहनधारकांना आवाहन

| मुंबई | प्रतिनिधी |

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. मात्र प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहनचालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.

महाराष्ट्र दिनी रोजी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे मार्गावरील कनेक्टिंग लिंक अर्थात मिसिंग लिंकचे लोकार्पण झाले. महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेग मर्यादा जाहीर केली आहे. तसेच बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी 100 किमी वेग मर्यादा आणि बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी 80 किमी वेग निश्चित केला आहे. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील दोन बोगदे व दोन पुलावर पूर्णपणे 247 सीसीटीव्ही यंत्रणेचे लक्ष आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष असून द्रुतगती मार्गावर थांबणाऱ्या गाड्यांची माहिती महामार्ग पोलिसांना दिली जाणार आहे.

सेल्फी, फोटो आणि रिल काढण्यासाठी थांबू नका, नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते. तसेच, तुमच्यासह इतरांच्याही वाहनांना धोका होऊ शकतो. या कारणास्तव, नियमांचे पालन करा आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

Exit mobile version