रायगड जिल्हा प्रशासन भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालत असल्याचा शिवराज्य ब्रिगेडचा आरोप?
। अलिबाग । प्रतिनिधी ।
(Raigad civil hospital) रायगड जिल्हा रुग्णालयाची धुरा हाती घेतल्यापासून डॉ. सुहास माने यांनी अनेक जीवघेणी कृत्ये केली. त्यामुळे सर्वसामान्यांचे आतोनात हाल झाले. त्यांची अकार्यक्षमता नेहमीच चव्हाट्यावर आली. त्यामुळे अकार्यक्षम हुकूमशहा असा उल्लेख डॉ. सुहास मानेंचा होत असल्याने जनता जनार्दनाने त्यांना नवी पदवी बहाल केली असल्याचे समोर आले आहे. परिणामी, या मलिन प्रतीमा असलेल्या डॉक्टरची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी शिवराज्य ब्रिगेडच्यावतीने अध्यक्ष जगदिश घरत यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकार्यांनाही दिले आहे.
शासकीय कर्मचारी सुट्टीवर जातात म्हणून कंत्राटी कामगारांची अडवणूक आणि छळवणूक डॉ.माने यांच्या मार्फत झाली आहे. याबाबत ओम साई सेवा संस्था, कर्जत यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार सुद्धा दाखल आहे. पण सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवून कार्य करणार्याच्या डॉ.माने यांना शासकीय पातळीवर अभयच मिळत आहे. याबाबत सविस्तर चौकशी झाली पाहिजे.
स्वतःच्या पदाचा गैरवापर करून, पदनियुक्त्या करणे, ज्या वैद्यकिय सहकारी अधिकार्यांची ज्या ठिकाणी गरज आहे, तिथे त्याला न ठेवता इतर काम करण्यास भाग पाडणे, हा मनमानी कारभार आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून रुग्णांच्या विम्यासाठी जी कंपनी नियुक्त केली होती, तिला कोणतेही सहकार्य डॉ.माने यांच्यामार्फत झालेले नाही. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी व्हीडीओ बनवून डॉ.मानेंबद्दल सोशल मिडियावर, वृत्तपत्रामध्ये, ठिकठिकाणी त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्योच काम केले आहे. हे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सुद्धा पोचले आहे. परंतु याची दखल आजपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून का घेतली गेली नाही, हा मोठा प्रश्नच आहे.
रूग्णांच्या नातेवाईकांचे फोन न उचलणे, ज्या पदावर डॉ.माने कार्यरत आहेत त्याची जबाबदारी झटकणे, रुग्णालयात उपलब्ध नसणे आणि ते कोणालाही माहित नसणे इतका अनागोंदी कारभार डॉ. माने यांचा सुरू आहे. कोरोना काळामध्ये रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉ.माने यांच्या कारभाराबद्दल जे व्हीडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये डॉ. माने यांच्या हलगर्जी कारभारामुळेच रुग्ण दगावलेले आहेतख्, असा 50 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांचा आरोप आहे.
वरील सर्व माहिती ही संक्षिप्त स्वरूपातच आहे. डॉ.माने यांच्या हलगर्जीपणामुळे, त्यांच्या हुकूमशाही कारभारामुळे अनेक रूग्णांना त्यांचे प्राण कोरोना काळात गमवावे लागले आहेत. असे नातेवाईकांचे म्हणणे आहे आणि ते त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मिडीयाच्या माध्यमातून, सोशल मिडीयावर सादर केेले आहेत. त्यामुळे कोरोना काळामध्ये दगावलेल्या सर्व रूग्णांची आकडेवारी मागवून त्यांची चौकशी करण्यात यावी. या सार्या प्रकारास जबाबदार असणार्या डॉ.मानेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब सेवेतून बडतर्फ करावे. तसेच त्यांना कुठल्याही जिल्ह्याचा कारभार देऊ नये, जेणेकरुन सर्वसामान्य जनता पुन्हा डॉ.माने यांच्या त्रासाला बळी पडणार नाही. अशी मागणी जगदिश घरत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.