निष्काळजीपणाने उपचार करणार्‍या डॉक्टरांना 15 लाखांचा दंड

रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे आदेश
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अपघातात जखमी झालेल्या नामंवत वकिलावर लाईफ लाईन रुग्णालय येथे निष्काळजीपणाने उपचार केल्याने उजवा पाय कापला तर डावा पाय देखील अपंग करण्यात आला. त्यानंतरही चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आले. त्यामुळे जखमी इसमाला पुन्हा जे जे रुग्णालयात जाऊन उपचार करुन घ्यायला लागले. त्यावर सुनावणी देत रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तक्रारदारास शारीरिक, मानसिक आणि आर्थीक व तक्रारीच्या खर्चापोटी 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अ‍ॅड.रविंद्र पाटील यांना 2 डिसेंबर 2009 रोजी डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला. पोलिसांनी बोलावलेल्या रुग्णवाहिकेतून अ‍ॅड रविंद्र पाटील यांना लाईफ लाईन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी संबंधीत रुग्णालयात अ‍ॅड पाटील यांच्या मित्र आणि नातेवाईंकाना भेटू न देता भीती निर्माण केली असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला. तसेच कुठलीही माहिती न देता पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी डाव्या पायाची गुडघ्यापासून ते तळ पायापर्यंतची रक्त वाहिनी काढुन टाकण्यात आली. याबाबत विचारणा केली असता सदरची वाहिनी उजव्या पायात बसविण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात उजवा पाय फ्रक्चर झाला असताना डाव्या पायाची रक्तवाहिनी काढण्याची गरज नव्हती.

उपचारादरम्यान रुग्णाला नातेवाईकांना भेटू दिले जात नसत तसेच जास्तीचे औषधे मागविली जात असत. करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली की नाही याची देखील खात्री करण्यात आली नाही. चुकीच्या पद्धतीन करण्यात आलेल्या उपचारानंतर पाय कापावा लागेल असे सांगण्यात आले. पाय न जोडता कुजलेल्या अवस्थेतच सर्जरी करण्यात आली. त्यामुळे पायात इन्फेक्शन झाले. त्यावर डिस्चार्ज मागीतला असता मेडीकलची फाईल देण्यासा टाळाटाळ करण्यात आली. त्यांनतर तब्बल 2 लाख रुपये उपचार आणि 1 लाख 25 हजारांचे औषधांचे बील आकारण्यात आले. त्यानंतर सदर रुग्णाने जे जे रुग्णालयात जाऊन उपचार केले असता 25 हजार रुपयांत यशस्वी सर्जरी करण्यात आली. त्यामुळे लाईफ लाईन रुग्णालयाविरोधात तक्रारदाराने रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली. तक्रारदार यांच्यावतीने अ‍ॅड वैशाली बंगेरा यांनी जोरदार युक्तीवाद केला. त्यावर सुनावणी केल्यानंतर रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष रविंद्र नगरे आणि सदस्य अशोक सालफळे यांनी सर्व साक्षी पुरावे यांच्या आधारे सर्व मुद्यांतील विवेचनावरुन तक्रारदारांचा पायावर उपचार करताना निष्काळजीपणे व हलगर्जीपणामुळे पाय गमवावा लागला आणि कायमचे अपंगत्व आले. त्यानंतर सुध्दा रुग्णाला जे जे रुग्णालयात उपचार करुन घ्यावे लागले. त्यामुळे तक्रारदारास आर्थीक, शारिरिक व मानसिक त्रास झाल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे लाईफ लाईन रुग्णालय आणि डॉ. सागर गुडेवार, डॉ संतोष बिराजदार यांनी तक्रारदार यांना 15 लाख रुपयांचा दंड सुनावला. तसेच आदेश दिल्यापासून 45 दिवसात त्याची पुर्तता न केल्यास त्यावर 12 टक्के व्याजदराने रक्कम फिटेपर्यंत देण्याचा निर्णय दिला आहे.

Exit mobile version