रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
|रायगड | प्रतिनिधी |
राज्यातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवरून डॉक्टरांच्या आंदोलनाने आता अधिक तीव्र स्वरूप धारण केले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD), असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (ASMI) तसेच विविध स्पेशालिस्ट संघटनांनी आंदोलनात संयुक्तपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आयएमए अलिबागतर्फे रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
आयएमए अलिबागचे अध्यक्ष डॉ. विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. संयुक्त निवेदनात BHMS-CCMP नोंदणी प्रक्रिया, निवासी डॉक्टरांच्या सेवा, प्रशिक्षण व कल्याणाशी संबंधित प्रश्नांवर शासनाकडून अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
डॉक्टर संघटनांच्या मते, स्पष्ट कायदेशीर व नियामक चौकटीचा अभाव आणि शासनाकडून समाधानकारक हमी न मिळाल्यामुळे डॉक्टरांमध्ये असंतोष वाढला आहे. याचा परिणाम रुग्णांच्या सुरक्षिततेवर, वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासावर होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे आयएमए महाराष्ट्रने सुरू केलेल्या नियमित व गैर-आपत्कालीन वैद्यकीय सेवा बंद आंदोलनाला MARD, ASM आणि सर्व स्पेशालिस्ट संघटनांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती डॉ. विनायक पाटील यांनी दिली. संयुक्त निवेदनात शासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, प्रलंबित मागण्यांवर तातडीने समाधानकारक निर्णय न झाल्यास आपत्कालीन वैद्यकीय सेवांसह बेमुदत सेवा बंद आंदोलन करण्यात येईल. तसेच BHMS-CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करून सर्व संबंधित प्रश्नांवर तोडगा काढावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी डॉ. समीर नाईक, डॉ. राहुल म्हात्रे, डॉ. राजेंद्र चांदोरकर, डॉ. सचिन जायभाय, डॉ. सौरभ पाटील, डॉ. सागर खेडू, डॉ. वाजे, डॉ. पूनम नाईक, डॉ. रेश्मा चेऊलकर, डॉ. शिंदे, डॉ. वैभव चेऊलकर आणि डॉ. अमृत माने उपस्थित होते.
न्यायालयीन सुनावणीकडे लक्ष
दरम्यान, डॉक्टरांच्या आंदोलनासंदर्भात महत्त्वाची घडामोड घडण्याची शक्यता असून, या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतल्याची माहिती डॉक्टर संघटनांमध्ये प्रसारित झाली आहे. आज दुपारी होणाऱ्या संभाव्य सुनावणीकडे राज्यातील डॉक्टर, रुग्ण आणि आरोग्य क्षेत्राचे लक्ष लागले असून, या माध्यमातून आंदोलनावर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
