श्वान पथकाची दमदार कामगिरी
| रायगड | प्रमोद जाधव |
आधूनिक युगामध्ये कोणतीही माहिती हवी असल्यास गुगलवर सर्च करून आपण माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतो. मात्र, रायगड पोलीस दलातील श्वासन पथकाने या वर्षात दमदार कामगिरी करीत अंमली पदार्थ तस्करीसह अपहरण व अन्य गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे डॉग स्कॉड गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरले आहेत. अगदी कमी वेळेत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांची माहिती पोलिसांना देण्याचे काम केले आहे.
रायगड पोलीस दलातील पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्ह्यात आठ पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय, 28 पोलीस ठाणे, सायबर पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखा, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आहेत. जिल्ह्यात 2 हजार 300 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारीसह गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याचे काम रायगड पोलीसांमार्फत कायमच केले जाते. अपहरण, चोरी, घरफोडी, खून अशा अनेक प्रकारच्या गुन्हे रायगड पोलीस उघडकीस आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतात. जिल्ह्यासह राज्यातील व राज्याबाहेरील टोळीला जेरबंद करण्याचे कामही पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.
पोलिसांच्या मदतीसाठी रायगड पोलीस दलात डॉग स्कॉड ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे. या पथकामार्फत गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम केले जाते. रायगड पोलीस दलात मर्फी, ऑस्कर, रॉकी, रुफस नावाचे श्वान आहे. एखादी घटना घडल्यावर या श्वान पथकाद्वारे गुन्ह्याची माहिती घेण्याचे काम केले जाते. जिल्ह्यात पेण, पोयनाड, पाली, रेवदंडा, मूरूड, अलिबाग या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीसह अंमली पदार्थांची तस्करीचे गुन्हे दाखल झाले होते. श्वान पथकातील मर्फी, ऑस्कर, रॉकी, रुफस यांनी आपल्या शैलीने या गुन्ह्यांची उकल काही तासांमध्येच केली. एकूण आठ गुन्हे उघडकीस आणण्यास या पथकाला यश आले असून डॉग स्कॉड गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरले आहेत.
