19 वर्षांपासून देशाची सेवा करणारा हा जवान शहीद
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
हिजाब आणि भगवा यावरुन भांडू नका. जेव्हा आम्ही अशा गोष्टी पाहतो तेव्हा आम्हाला फार त्रास होतो, हे शब्द आहेत एका भारतीय सैनिकाकडून आलेल्या शेवटच्या काही व्हॉइस मेसेजेसमधील. भारतीय लष्करामध्ये हवालदार म्हणून सेवा बजावत असणारे 37 वर्षीय अल्ताफ अहमद हे काश्मीरमध्ये बुधवारी झालेल्या हिमस्खलनात बर्फाखाली अडकले आणि शहीद झाले.
अल्ताफ यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मित्रांनी सोशल मीडियावर त्यांनी पाठवलेला शेवटच्या काही व्हॉइस मेसेजेसपैकी एक शेअर केलाय. या मेसेजमध्ये अल्ताफ लोकांना एकमेकांमधील मतभेद दूर करण्याचं आवाहन करत आहेत. सुखरुप राहा. धर्म आणि जातीच्या नावाने भांडू नका. तुम्ही सुरक्षित रहावं म्हणून आपले सैनिक येथे (काश्मीरमध्ये) तैनात असून प्राणांची बाजी लावत आहेत. देशाबद्दल विचार करा आणि तुमच्या मुलांनाही हेच शिकवा, असे या व्हॉइस नोटमध्ये अल्ताफ यांनी म्हटले आहे.
हिजाब आणि भगवा यासाठी वाद घालू नका. अशा गोष्टी पाहिल्यावर आम्हाला त्रास होतो. देशातील सर्वच नागरिक ही भली माणसं असून आपण सर्वजण भारतमातेची मुलं आहोत याच विचाराने आम्ही इथे ड्युटीवर असताना विचार करतो. आमचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका अशी विनंती करतो. आम्ही अशा गोष्टी (हिजाब वादासारख्या) ऐकतो तेव्हा आम्हाला वाईट वाटते कारण (देशासाठी) अनेकजण सीमेवर प्राण गमावताना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतोय, असे अल्ताफ यांनी व्हाइस नोटमध्ये सांगितले होते. कर्नाटकमधील कोडागू येथील असणारे अल्ताफ हे भारतीय लष्कराच्या तोफखाना विभागामध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मागील 19 वर्षांपासून ते लष्करामध्ये कार्यरत होते.