। मुंबई । प्रतिनिधी ।
जे नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले आहेत त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे कायमसाठी बंद असतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले आहेत. शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकारी, आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्ष सोडून गेलेल्यांना आता पक्षात जागा नाही. तसेच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 70 ते 80 जागा मिळणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, अशा सूचना पवारांनी दिल्या आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार गटाची बैठक पार पडली. बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष, खासदार सुप्रीया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते.
मोदींच्या जाहिरातबाजीवर टीका केंद्र सरकार काही ठराविक लोकांचा प्रचार करण्यासाठी जी-20 कार्यक्रमाचा वापर करत आहे. जी-20 नेत्यांसाठी तांब्याचा-चांदीच्या भांड्याचा वापर मी कधी यापूर्वी ऐकला नाही. नेत्याची प्रतिमा वाढवण्यासाठी हे केलं जातंय, अशी टीका त्यांनी केली. जी-20 सारख्या परिषदा यापूर्वी दोनदा आपल्या देशात झाल्या. एकदा इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना झाली होती. पण त्यावेळी आज ज्या पद्धतीचं वातावरण होतं, तसं नव्हतं. त्यावेळी देखील जगातले लोक भारतात आले होते. जगातले राष्ट्रपती आपल्या देशात येतात त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. पण यामुळे मूलभूत प्रश्न सोडून काही ठराविक लोकांचा मोठेपणा दाखवण्यात आला आणि याची चर्चा आज ना उद्या देशांत नक्की होईल', असं शरद पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा करुन घेण्यासाठी अशाप्रकारचे काम केले जात आहे. यापेक्षा सामान्यांचे हित, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी अशा प्रश्नांकडे सध्याचे सत्ताधारी पाहात नाहीत. याची जाणीव लोकांना करु देण्यासाठी आम्ही त्यांच्यामध्ये जाऊन प्रचार करु, असं पवार म्हणाले.