मुरुड नगरपरिषदेचा निर्णय
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड नगरपरिषदेकडून शहराच्या हद्दीबाहेरील नळधारकांसाठी पाणीपट्टीत तब्बल शंभर टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयामुळे ग्रामीण व शहराबाहेरील नागरिकांवर आर्थिक बोजा वाढणार आहे. 17 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 26 द्वारे ही वाढ मंजूर करण्यात आली असून, 1 एप्रिलपासून तिची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
मुरुड शहराची लोकसंख्या सुमारे बारा हजारांच्या पुढे असून, येथील पाणीपुरवठा प्रामुख्याने आंबोली धरणातून केला जातो. याशिवाय काही प्रमाणात गारंबी धरणातूनही पाणीपुरवठा केला जातो. शहरातील नागरिकांसोबतच पाईपलाईनद्वारे शहराबाहेरील काही गावांनाही पाणी पुरवले जाते. या निर्णयानुसार, शहराबाहेरील नळधारकांना भरावी लागणारी पाणीपट्टी दुप्पट करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, एखाद्या नळधारकाची वार्षिक पाणीपट्टी 1460 रुपये असेल, तर आता त्याला 2920 रुपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे शहराबाहेरील नागरिकांना या वाढीचा थेट फटका बसणार आहे.
मुरुड नगरपरिषदेकडून शहराबाहेरील 89 निवासी आणि 9 व्यावसायिक नळधारकांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच शीघ्रे, तेलवडे आणि वाणदे ग्रामपंचायत हद्दीतही नगरपरिषदेच्या माध्यमातून पाणी दिले जाते. काही ठिकाणी मीटरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, दर वेगवेगळे आहेत. या पाणीपट्टी वाढीमुळे नगरपरिषदेच्या महसुलात वाढ होणार असून, पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी आर्थिक बळकटी मिळेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
याबाबत नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी स्पष्ट केले की, मुरुड शहरातील नागरिकांच्या पाणीपट्टीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. शहराबाहेरील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यावरच ही वाढ लागू करण्यात आली असून, हा निर्णय सर्व नगरसेवकांच्या सहमतीने घेण्यात आला आहे. यामुळे पाणीपट्टीच्या वार्षिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. दरम्यान, या वाढीमुळे शहराबाहेरील नागरिकांमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत असून, वाढीचा पुनर्विचार करण्याची मागणीही पुढे येण्याची शक्यता आहे.
