डॉ. अनिकेत देशमुख यांची आंदोलनस्थळी भेट

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आवाज उठविण्याची ग्वाही

| पुणे | प्रतिनिधी |

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शेकापचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी मंगळवारी (दि.6) प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मागण्या, त्यांच्या अडचणी तसेच आंदोलनामागील भूमिका जाणून घेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका स्पष्ट केली.

आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या संघर्षात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळणे आणि त्यांच्या मागण्यांवर शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे डॉ. देशमुख यांनी यावेळी सांगितले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य त्यांच्या मेहनतीशी आणि उपलब्ध संधींशी जोडलेले आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे केवळ आंदोलन म्हणून न पाहता विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न म्हणून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अनेक वर्षे सातत्याने अभ्यास, मेहनत आणि आर्थिक खर्च करून आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करत असतात. परीक्षेतील बदल, प्रक्रिया किंवा निर्णयांचा थेट परिणाम त्यांच्या तयारीवर आणि भविष्यातील संधींवर होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन संवादातून मार्ग काढावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.“ विद्यार्थ्यांचा हा संघर्ष केवळ एका मागणीपुरता मर्यादित नसून, त्यांच्या भविष्याचा संघर्ष आहे. मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शेकाप पक्ष विद्यार्थ्यांच्या सोबत असून, त्यांच्या प्रश्नांसाठी आवश्यक त्या पातळीवर आवाज उठविला जाईल,” अशी भूमिका डॉ. अनिकेत देशमुख यांनी व्यक्त केली. आंदोलनस्थळी उपस्थित विद्यार्थ्यांनीही आपल्या विविध मागण्या आणि समस्या डॉ. देशमुख यांच्यासमोर मांडल्या. विद्यार्थ्यांच्या भावना आणि मागण्यांची दखल घेत त्यांच्या प्रश्नांवर पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Exit mobile version