शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचे निधन

। कोल्हापूर । प्रतिनिधी ।

शिक्षणतज्ज्ञ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी (दि.4) कोल्हापूरमध्ये निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, मंगळवारी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रात व इतरत्र अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करत शिक्षणाची ज्ञानगंगा अनेक विद्यार्थ्यांसाठी खुली केली. त्यांनी राजकारणात अनेक मोठंमोठी पदे भुषवली. कार्यकर्ता, महापौर ते राज्यपाल असे अनेक पदे त्यांनी भुषवली. राजकीय-सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते. त्यांच्या निधनाने राजकीय आणि शिक्षण क्षेत्रातील दूरदर्शी तज्ज्ञ गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बुधवार, दि.5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कसबा बावडा येथील यशवंत निवास या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रा सुरू होणार आहे. कसबा बावडा येथील डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version