अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक ऐवजी मूळ पदावर परतण्याचे आदेश
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी यांचे पद धोक्यात आले आहे. त्यांना अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदावरून हटवून शरीर विकृतीशास्त्रज्ञ या मूळ पदावर काम करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. मात्र, आदेश देऊन दोन महिने उलटूनही त्यांची कार्यमुक्ती झालेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या आदेशालाच रुग्णालय प्रशासनाकडून हरताळ फासला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अलिबाग येथे अडीचशे खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. या रुग्णालयात गेल्या तीन वर्षांपासून पूर्णवेळ अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक नव्हते. त्यामुळे वेळोवेळी अन्य डॉक्टरांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. डॉ. शीतल जोशी गेल्या दीड वर्षापासून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा कार्यभार सांभाळत होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांची पूर्णवेळ अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता त्यांचे हे पदच धोक्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये मंजूर आकृतिबंधानुसार अधिकाऱ्यांची पदस्थापना होणे आवश्यक आहे. रुग्णालयांमध्ये विशेष सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मंजूर पदांनुसार विशेषतज्ज्ञांची नियुक्ती करणे अपेक्षित आहे. याच प्रशासकीय कारणास्तव अतिरिक्त पदभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावर कार्यरत राहण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.
यामध्ये डॉ. शीतल जोशी यांचाही समावेश असून, त्यांना अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदाऐवजी शरीर विकृतीशास्त्रज्ञ या मूळ पदावर काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, आदेशाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. वरिष्ठ विभागाचे आदेश असतानाही कार्यमुक्ती रखडल्याने रुग्णालयातील प्रशासकीय कारभाराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांना त्यांच्या मूळ पदावर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, सध्या त्यांच्या जागी दुसरे कोणीही अधिकारी आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडेच ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
डॉ. निशिकांत पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड






