डॉ. तात्याराव लहाने सेवानिवृत्त

। मुंबई । वृत्तसंस्था ।
अंधांना दृष्टी देण्यासाठी गेली अनेक वर्षे झगडत असलेले ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने 36 वर्षांच्या शासकीय सेवेनंतर बुधवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संचालकपदावरून निवृत्त झाले.
बीडमध्ये अधिव्याख्याता म्हणून 1985 साली ते शासकीय सेवेत रुजू झाले होते. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंधत्व आलेल्यांना दृष्टी देण्याचे काम त्यांनी आठ वर्षे केले. त्यानंतर धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही त्यांनी सेवा दिली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात 1994 ला रुजू झाले. जे. जे. रुग्णालयातील डॉ. रागिनी पारेख, मारुती शेलार यांच्यासह 67 जणांच्या चमूच्या मदतीने ग्रामीण, दुर्गम भागांत नेत्रशिबिरे आयोजित करण्याचे कार्य डॉ. लहाने यांनी गेली 25 वर्षे अविरतपणे केले. जे. जे. रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून कार्यरत असताना रुग्णालयामध्ये कार्यालयीन इमारत, गरजू रुग्णांसाठी धर्मशाळा बांधण्यात आल्या. तसेच त्यांच्या कारकीर्दीत 1100 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय मंजूर क रून घेतले असून याचे कामही आता सुरू आहे. त्यांना पद्माश्री पुरस्कारासह 500हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संचालक पदावरुन निवृत्त झाल्यामुळे आता अंधत्व नियंत्रण व नेत्र रुग्णांच्या शस्त्रक्रियेचे माझे कार्य करण्यासाठी अधिक वेळ देता येईल याचा आनंद आहे. कोरोना कृतिदलाचा सदस्य म्हणूनही मी कार्यरत राहणार आहे,असे डॉ. लहाने यांनी सांगितले.

Exit mobile version