| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपालिका हद्दीत नालेसफाई न करताच परस्पर कोणतीही निविदा प्रसिद्ध न करता टक्केवारी घेऊन बिले पास केली जात आहेत, असा आरोप होत आहे. यावर्षी तर काही तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात ढोपरभर पाणी साचल्याने दृश्य बघावयास मिळत होते. यावरून याही वर्षी नालेसफाई न करता अधिकारी वर्गाच्या संगनमताने बिले घेतली असल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे.
उरण नगरपालिकेत अंधाधुंदी कारभार सुरू आहे. थातुरमातुर उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे. नगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती असतानाही कोणतेही काम अथवा चेक हे राजकीय नेतेमंडळीच्या हस्ताक्षेपशिवाय पूर्ण होत नसल्याचा आरोप ठेकेदारांकडून केला जात आहे. अधिकारी वर्गावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ते माजोरे बनले आहेत. अधिकारी वर्गाच्या मालमत्तेची सखोल चौकशी केली तर नक्कीच त्यांचा भ्रष्टाचाराचा घोटाळा उघड होईल, अशी जनतेत चर्चा सुरू आहे.
आज काही तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे नगरपालिकेच्या अनेक रस्त्यावर ढोपरभर पाऊस साचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावरून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नालेसफाईची निविदा प्रसिद्ध न होता परस्पर ठेका दिला असल्याचे समजते. सदरचा ठेका हा एकाच ठेकेदाराला दरवर्षी कसा मिळतो हे गुलदस्त्यात आहे. तसेच इतर अनेक कामांसाठी दान देणारा दाणीच एकमेव ठेकेदार नगरपालिकेकडे असल्याची धक्कादायक माहिती नगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.