अपघाताची रेल्वे प्रशासनाला प्रतीक्षा?
| खांदेश्वर | प्रतिनिधी |
पनवेल रेल्वे स्थानकातील हार्बर मार्गाच्या फलाटावर असलेल्या ड्रेनेज लाईनवरील झाकणांची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. हे ड्रेनेज झाकण रेल्वे फलाटाजवळ असल्याने रेल्वेतून उतरताना त्यात एखाद्याचा पाय अडकून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखादा अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून विचारला जात आहे.
पनवेल स्थानकात सकाळपासून रात्रीपर्यंत हजारो प्रवासी हार्बर मार्गाच्या फलाटावरून रेल्वे पकडण्यासाठी धावपळ करीत असतात. त्यामध्ये चाकरमानी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने असतात. मात्र, ड्रेनेजवरील झाकणांची दुरवस्था प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणारी ठरत आहे. हे ड्रेनेज झाकण रेल्वे फलाटाजवळ आहे. या ठिकाणी पाय चुकून अडकला अथवा प्रवाशाचा तोल गेला तर गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने या समस्येवर तात्पुरता उपाय म्हणून ड्रेनेजवर मार्बलची लादी ठेवली आहे. मात्र, ही लादीदेखील तुटलेली असून, त्यामुळे धोका आणखी वाढला आहे. दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या फलाटावर अशी परिस्थिती असणे गंभीर बाब आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे लक्ष रेल्वे पकडण्याकडे असते. त्यामुळे पायाखालील धोकादायक भाग अनेकदा नजरेस पडत नाही. एखाद्या प्रवाशाचा पाय अडकून अपघात झाल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. या समस्येबाबत अनेक दिवसांपासून परिस्थिती कायम असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.
