द्रविड यांची वकिली!

भारतात या मग दाखवितो! क्रिकेटमध्ये पूर्वी वाईट पद्धतीत हरल्यानंतरची आपली प्रतिक्रिया होती. विशेषतः कसोटी सामन्यात किंवा मालिकेत भारताची दाणादाण उडाल्यानंतर अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटायच्या. मात्र, एकदिवसीय मालिकेत अशा प्रतिक्रिया फारशा येत नाहीत. कसोटी क्रिकेटमध्ये आखाडे बनवून भारताने सर्वच परदेशी संघांना लोळविल्याचे आपण पाहिले आहे. खेळपट्टीबाबत जेव्हा मर्यादित षटकांच्या किंवा एक दिवसीय सामन्यासाठीच्या खेळपट्टीबाबत तक्रारी येतात तेव्हा त्याचे आश्चर्य वाटते.

भारतातील स्पर्धांसाठी ॲन्डी ॲटकिन्सन या आयसीसीच्या खेळपट्टी विषयक तज्ज्ञाने भारताच्या सर्व केंद्रांना, या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी खेळपट्टी सर्वांना समान संधी देणारी कशी असावी याबाबत लेखी आणि तोंडी आदेश दिले होते. त्यानुसार ज्यांनी खेळपट्ट्या तयार केल्या नाहीत, त्याबाबतचे पडसाद आयसीसीच्या खेळपट्टी ‌‘रेटिंग’ मध्ये उमटले. त्यावर यावेळी उसळून कोण उठले असेल तर ते भारतीय संघांचे प्रशिक्षक राहूल द्रविड. खरं तर राहूल द्रविड यांनी प्रतिक्रिया देण्याची गरज नव्हती. कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कुणाला तरी वाचविण्यासाठी त्यांनी केलेली ही ओरड आहे. द्रविड यांनी अशा खराब खेळपट्टी तयार करणाऱ्यांची वकिली करताना म्हटले आहे की, साडेतीनशे धावसंख्या ज्या खेळपट्टीवर झाली तीच उत्तम आणि अन्य खेळपट्ट्या नाहीत का?

खरंतर द्रविड यांना राग येण्याचे कारण म्हणजे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या अहमदाबाद स्टेडियमची खेळपट्टी सुमार दर्जाची असल्याचा निष्कर्ष आयसीसीने अलिकडेच जाहीर केलेल्या रेटिंगमध्ये स्पष्ट केला आहे. 50 षटकांच्या सामन्यात 200 ही धावा न झालेली दुसरी खेळपट्टी होती चेन्नईची. चेन्नईच्या खेळपट्टीबाबत फक्त परदेशी संघच नव्हे तर भारतातील बहुतेक रणजी संघांची देखील तक्रार आहे. खेळपट्टीची बांधणी व्यवस्थित न झाल्यामुळे ती खेळपट्टी लवकर तुटते असा समज भारतातील बहुतेक राज्यांच्या प्रमुख संघामध्ये दृढ आहे. तेथे रणजी सामना खेळायला सहसा कुणीही राजी होत नाही. अहमदाबादची खेळपट्टी अलिकडेच चांगली होत होती, मात्र भारतीय संघाचे लाड पुरविण्याच्या नादात अनेकदा यजमान असोशिएसन्स तोंडघशी पडले आहेत. त्यामुळेच बहुदा द्रविड यांनी यामध्ये तोंड घातले असावे.

मुळातच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसारख्या प्रतिष्ठेच्या आणि जगातील सर्व सर्वोत्तम क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या संघांमधील ही स्पर्धा. क्रिकेटपटूच्या सर्व प्रकारच्या कौशल्याची कसोटी लागेल आणि दर्जेदार गुणवत्ता तावून सुलाखून त्यातून बावनकशी सोन्यासारखी चमकेल अशी आशा असते. त्यामुळेच यावेळी आयसीसीने खेळपट्टी कशी असावी याबाबतचे निकष निश्चित केले होते. बहुतेक केंद्रावर ते पाळले गेले आहेत. मात्र भारतीय संघ जेव्हा जेव्हा आणि ज्या ज्या केंद्रावर खेळला, त्यावेळी यजमानांना हवी तशी खेळपट्टी तयार करण्यात आली. आपल्या सामन्याच्या आधी भारतीय संघ व्यवस्थापनातील अनेक मातब्बर मंडळी यजमान क्रिकेट असोसिएशनवर दबाव आणीत असतात. म्हणजेच पाणी कमी करणे व खेळपट्टी अधिक कोरडी राहील व त्यामागे ती लवकर तुटेल असा प्रयोग केला जातो. त्यापुढे जात काही वेळी गुडलेंथ स्पॉटवर ‌‘काटा’ (तारेचा) मारून तेथे खडबडीत करण्याचे सुचविले जाते. काही ठिकाणी याच स्पॉटवर कमी अधिक प्रमाणात गवत किंवा पट्टा ठेवण्याचे आदेश दिले जातात ही शुद्ध फसवणूक आहे आणि भारतात गेल्या काही वर्षांपासून आपल्या संघाला जिंकविण्यासाठी सुरू आहे.

मात्र, राहूल द्रविड यांना तसे वाटत नाही. स्वतः खेळतानाही त्यांनी खेळपट्टीबाबत कधीच मतप्रदर्शन केले नव्हते. मात्र त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी उत्तर देत आहे. कारण बीसीसीआयला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला आवडत नाही. त्यांनी, म्हणजे त्यांच्या सचिवांना हेच म्हणणे आयसीसीकडे मांडता आले असते. परंतु त्यांना कोणत्याही समस्यांवर तोंड उघडण्याची सवय नाही, सराव नाही. क्रिकेटच्या बाबतीत अनभिज्ञ असल्यामुळे असे होणारच. खरंतर सर्व केंद्रांनी भारतासह सर्व सामन्यांसाठी स्पोर्टिंग खेळपट्ट्या ठेवण्याचे आदेश देणे गरजेचे होते. आयसीसीचे निकष पाळूनच खेळपट्ट्या तयार करा, असे ठामपणे सांगणे गरजेचे होते. त्याऐवजी भारतीय संघाच्या हट्टापायी आणि लाडापायी हे घडत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंदूर येथील कसोटीत आपण खणलेल्या खड्ड्यात स्वतःच पडलो होतो. त्यानंतर लगेचच अहमदाबाद येथील खेळपट्टी बदलण्यात आली आणि अनिर्णित सामन्यावर समाधान मानले गेले. हे फक्त भारतातच होते, अन्यत्रही होते. परंतु एवढ्या प्रमाणात आणि राजरोसपणे नाही.

Email: vinayakdalvi41@gmail.com

Exit mobile version