अवकाळी पावसामुळे वाळवणात अडचणी
| रायगड | प्रतिनिधी |
अवकाळी पावसाने बळीराजाबरोबर आता कोळीबांधवही संकटात सापडला आहे. वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारीसाठी खोल समुद्रात जाणे धोक्याचे ठरत आहे. अशातच सुकलेल्या मासळीच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरही गदा आल्याने हंगाम वाया जाण्याची भीती आहे. वर्षभरापासून समुद्रातून मिळणाऱ्या मासळीची आवक घटली आहे. त्यापाठोपाठ अवकाळी हजेरी लावल्याने किनारपट्टीच्या भागात सुकविण्यासाठी ठेवलेली मासळी भिजून गेली आहे. त्यामुळे सुकी मासळी विक्रीच्या हंगामातच लाखोंचे नुकसान झाले आहे. दसऱ्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले की दारासमोरील अंगणात शिल्लक मच्छीचे वाळवण टाकले जाते. त्यात सुकट, जवळा, बोंबील, सोडे, कोळंबी, आंबाड, वाकटी, बांगड्याचा समावेश असतो. सुक्या मच्छीला चवीमुळे मागणीही अधिक असते. दरवर्षी लाखोंची उलाढाल सुक्या मच्छीच्या विक्रीतून होत असते. पण यंदा पावसाने अजून काढता पाय घेतलेला नसल्याने त्याचा परिणाम सुक्या मासळीच्या हंगामावर झाला आहे.
बदलत्या हवामानाचा परिणाम
अवकाळी पावसामुळे नवी मुंबई, उरण भागातील सुक्या मच्छीची आवक घटली आहे. हवामानातील बदलांमुळे समुद्रातील पारंपरिक मासेमारीवर मर्यादा आल्या आहेत. यामुळे सुक्या मच्छीची आवक कमी झाली आहे. समुद्रातून मिळणाऱ्या माशांची आवक घटली आहे. परिणामी, सुक्या मच्छीची आवक कमी झाली आहे. या स्थितीमुळे उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला आहे.







