। पनवेल । वार्ताहर ।
गुजरात येथून पुणे येथे माल घेऊन जाणारा भरधाव ट्रक पुढील ट्रकवर जोरदार धडकल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सायन-पनवेल मार्गावर खारघर येथील उड्डाणपुलावर घडली. हा अपघात मृत ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातात मृत झालेल्या ट्रक चालकाचे नाव सुरेश पुजांजी खंदारे (42) असे असून, तो पुण्यातील आंबेगाव मंचर येथे राहण्यास होता. सुरेश आणि त्याचा मेहुणा मिलिंद साठे दोघेही मंचर येथील इनामदार यांच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत होते. या दोघांना गुजरात येथून पुणे फुरसुंगी येथे माल पोहोचविण्याचे काम मिळाले होते. त्यानुसार या दोघांनी गुजरात येथून आपल्या ट्रकमध्ये माल भरुन ते आळीपाळीने ट्रक चालवून पुण्याच्या दिशेने येत होते.
मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा ट्रक मुंबई-पुणे मार्गावर खारघर येथील उड्डाणपुलावर आला असताना चालक सुरेश खंदारे याने ट्रक भरधाव वेगात चालवून पुढे जाणार्या ट्रकला जोरात धडक दिली. त्यामुळे सुरेशच्या पोटावर स्टेअरींग धडकून त्याचा पाय बोनेट आणि क्लचच्या मध्ये अडकला. त्यामुळे मिलिंदने त्याला इतर वाहन चालकांच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे घटनास्थळी आग्नशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर आग्नशमन दलाच्या जवानांनी स्टेअरींग आणि क्लचचा भाग कापून अडकलेल्या सुरेशला बाहेर काढले. त्यानंतर त्याला कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.