नवी मुंबईत करोडोंचे ड्रग्ज जप्त

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल परिसराससह नवी मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये 12 कोटींचे ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागले असून याप्रकरणी 16 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबईत ड्रग्ज विक्रेत्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. गतवर्षी खारघर येथे नायजेरियन व्यक्तींच्या अड्ड्यावर छापा टाकून थर्टी फर्स्टच्या पाटर्यांमध्ये पुरवले जाणारे ड्रग्ज जप्त केले होते. त्यानुसार यंदाही थर्टी फर्स्टच्या अगोदरच पोलिसांनी ड्रग्ज विक्रेत्या टोळ्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मोहीम राबवली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकामार्फत ड्रग्ज विक्रीत सक्रिय असलेल्या नायजेरियन टोळ्यांची माहिती मिळवली होती. त्याद्वारे गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या पथकांनी एकाच वेळी परिमंडळ एक व दोनमधील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले.

यात 8 नायजेरियन व्यक्तींकडे एकूण 12 कोटींचे विविध प्रकारचे ड्रग्स मिळून आले, तर 8 नायजेरियन व्यक्ती बनावट कागदपत्रांद्वारे भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. या एकूणच कारवाईत 16 नायजेरियन नागरिकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, या कारवाई दरम्यान पासपोर्ट व व्हिसा संपलेल्या 73 ऑफ्रिकन नागरिकांना देश सोडून जाणेबाबतच्या नोटीसा अदा करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version