दगडाने ठेचून केले गंभीर जखमी
| म्हसळा | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात मद्यधुंद पर्यटकांची दादागिरी कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. हरिहरेश्वर येथील घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर मद्यधुंद पर्यटकांनी धारदार दगडाने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे.
सलीम घंसार (40) हा रात्री 9 च्या सुमारास माणगाव येथून म्हसळा येथे येत असताना घोनसे घाटात त्याला दोन वाहनांतील काही लोक ओव्हरटेक मारण्यावरून भांडण करत असल्याचे निदर्शनास आले. सलीम हे भांडण सोडवण्यासाठी गेला असता डस्टर या गाडीतील पाच मद्यधुंद पुणेकर पर्यटकांनी त्याला रस्त्यावर पाडून धारदार दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात सलीम गंभीर जखमी झाल्याचे पाहून पर्यटकांनी तेथून माणगावच्या दिशेने पळ काढला. मात्र, माणगाव पोलिसांनी या पाच आरोपींना अटक केली. सलीमच्या चेहर्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्याला म्हसळा येथून एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. पकडण्यात आलेल्या आरोपींवर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही पुणे पर्यटकांकडून खूप वेळा अशा प्रकारच्या वागण्याचे प्रकार घडले असून, याला आळा न बसल्यास यापुढे पुण्यातील पर्यटकांना म्हसळा-श्रीवर्धन तालुक्यात येण्यास बंदी घालणार, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.