हापूसचे उत्पादन घटल्याने बागायतदारांचे मोठं नुकसान

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यात मागील महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस व वाढलेले प्रदूषण याचा मोठा फटका यंदा आंबा पिकाला बसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

मुरुड तालुक्यातील खोकरी, राजपुरी, खारआंबोली या गावातून मुंबई, वाशी याठिकाणी दरवर्षी दहा हजार पेटी हापूस आंबा पाठविला जातो. त्याठिकाणी चांगला दर मिळतो. परंतु, आंबा पीक येण्यास उशीर झाल्याने बागायतदारांना चांगला दर मिळू शकला नाही.

रोजच्या मार्केटमध्ये आंबा कमी दरात विकाला जातो. भातपीक घेताना जेवढी शेतात मेहनत घ्यावी लागते, तेवढी आंबा पिकालाही घ्यावी लागते. वेळच्या वेळी फवारणी करावी लागते. या कामाकरिता मजुराला 500 रूपये प्रतिदिवस मोजावे लागतात.

यंदा अवकाळी पाऊस, प्रदूषण वाढल्याने आंबा पिकावर या भागात मोठा परिणाम झाला आहे. अनेक झाडांवर अजून कच्च्या कैर्‍या असून, हे फळ पिकायला मे महिना उजाडेल, अशी माहिती येथील बागायतदारांकडून दिली जात आहे. मागील काही वर्षे आम्ही फेब्रुवारी महिन्यात वाशी मार्केटला पेटी पॅक आंबा पाठवित आहोत. यंदा अद्याप पाठवू शकलो नाही. जी झाडे लिलावात घेतली आहेत, त्यावरदेखील फारसे फळ आले नसल्याने यंदा या व्यापारात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही आंबा फळाला काळी बुरशीदेखील दिसून येत आहे.वातावरण बिघडल्याने नारळ, आंबा, शेवगा, जाम, डवरणारी झाडे यांचीदेखील वाढ खुंटलेली आहे. असा प्रकार आपण या पूर्वी कधीही पाहिलेला नाही, अशी माहिती बागायतदारांनी दिली. मुरुडच्या जवळ असूनही मार्केटला हापूस आंब्याचा मागमूस अद्याप नाही, अशी स्थिती सध्या आहे.

Exit mobile version