अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 17 घरे जमिनदोस्त

1 हजार 516 जणांचे सुरक्षित स्थलांतर
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पुरपरिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी आतापर्यंत 3 कच्ची तसेच 14 पक्की घरे जमिनदोस्त झाली आहेत. म्हसळा तालुक्यातील आरोग्य केंद्राजवळ दरड कोसळल्याने इमारतीचे अंशतः नुकसान झाले आहे. कुठेही जिवीत हानी झाली नसली तरी दोन गोठे बाधीत होऊन एका म्हैस मृत्यूमुखी पडली आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 516 जणांचे सुरक्षित स्थलांतर केले आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्ह्यात मंगळवारी 143.80 मिमी सरासरी पावसाची नोंद असून सर्वाधिक पाऊस तळा येथे 245 मि.मी इतकी झाली आहे. तर महाड येथे 188 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. रात्री अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सुदैवाने रात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांची पातळी ओसरुन सध्या इशारा पातळीच्या खाली आल्याने सुस्कारा सोडण्यात आला. म्हसळा तालुक्यातील म्हाप्रळ आंबेत पुरार राज्यमार्ग येथे आंबेत रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती. उशिराने सदर वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे. माणगाव तालुक्यातील कलंजे येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु करण्यात आली होती. तसेच म्हसळा तालुक्यातील शिर्के आंबेत रस्त्यावर झाड पडले होते. तर तळा तालुक्यातील मेढा आदिवासीवाडी ते मेढे गावाला जाणार्‍या रस्त्यावरील नदीपुलावरुन पाणी वाहत आहे.

पोलादपूर तालुक्यातील चोळई येथे दरड कोसळल्याने खालची वाडी येथील 20 कुटूंबातील 85 जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच केवनाळे, धामणिचीवाडी, धामण, आंबेमाची केवनाळे, ढवळे वडघर बु. लहुळसे, मोरसोड, खोपड, साबर, कोतवाल बु. ओंबळी, धामणदिवी गावातील 231 कुटूंबातील 569 जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्याप्रमाणे महाड, माणगाव, पनवेल, पेण मुरुड तालुक्यील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
पेण तालुक्यातील खरवली पेणतले येथे वाडा पडून अंशतः नुकसान झाले. महाड घावरेकोंड येथे घराची भिंत कोसळून अंशतः नुकसान झाले आहे. तसेच तळा, अलिबाग फणसापूर तर्फे उमटे, महाड नानेमाची वाकी बु. पेण , मांदाड, उंबर्डे, आंबेत, संदेरी, तसेच पनवेल, माणगाव तालुक्यात घरांची पडझड झाली आहे.

Exit mobile version