। गुहागर । प्रतिनिधी ।
गुहागर तालुक्यात रविवारी दुपारपासून जोरदार कोसळणार्या पावसाने सोमवारीदेखील आपला जोर कायम ठेवला. त्यामुळे गुहाघरमध्ये अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.
असगोली मधलीवाडी येथील अनिल घुमे यांच्या घरासमोरील विद्युतखांबावरील दोन मुख्य वाहिनी तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. तर अडुर येथील अशोक देवळे यांच्या अंगणातील आंब्याचे जुने झाड कोसळून पडले. वेलदुर नवानगर येथील यशवंत जांभारकर यांच्या शौचालयावर दगड व माती येऊन शौचालयाचे नुकसान झाले. धोपावे येथे मुख्य विद्युत वाहिनीवर झाड पडल्याने धोपावे व त्रिशूळसाखरी येथील विद्युत पुरवठा बंद झाला होता. कोतळूक किरवलेवाडी येथे गंगाय भेकरे यांचे छप्पर कोसळले. असगोली खारवीवाडी येथील गायत्री पालशेतकर यांच्या घराची संरक्षण भिंत कोसळली. तर वडद येथील संजय सोमण यांच्या घराचे छप्पर कोसळले.
ग्रामपंचायत कौंढर काळसुर येथील सार्वजनिक विहिरीचे बांधकाम पडून नुकसान झाले आहे. मोहितेवाडी येथील प्रभावती मोहिते यांचे घरावर आंब्याच्या झाडाची फांदी पडून सुमारे 1100 रुपयाचे नुकसान झाले. आरे बौद्धवाडी येथील बांधकाम स्थितीत असलेला साकव पाण्याच्या प्रवाहामुळे स्टीलसह सेंट्रींग वाहून गेले. याठिकाणी पाहणी करून जेसीपी लावून पर्यायी पोस्टमार्ग करण्याचे काम चालू होते. तर भातगाव तिसंग येथील पार्वती वेले यांच्या घराशेजारील बांध सायंकाळी पावसामुळे कोसळून नुकसान झाले आहे. अंजनवेल बौद्धवाडी येथे रस्त्याच्या बाजूस दरड आली आहे. दरडमधील दगड रस्त्याच्या बाजूला सरकली असून दरड वरील इतर दगड सरकण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या खालच्या बाजूला बौद्धवाडीमधील घरे आहेत. त्यामुळे नागरिकांना स्थलांतर करण्यास प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.