| अलिबाग | प्रतिनिधी |
अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले. भातशेतीसह फळपिके तसेच 273 घरांची पडझड होऊन वित्तहानी झाली. तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तालुका चिटणीस, महिला आघाडीच्या वतीने तालुकास्तरावर निवेदन देण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळपासून अवकाळी पाऊस जिल्ह्यात बरसला. या पावसामुळे शेती पाण्याखाली गेली असून, तलाव, विहिरी भरुन गेल्या आहेत. नद्या-नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. मागील 24 तासांमध्ये 160.45 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस अलिबाग, मुरूड, म्हसळा, पनवेल, रोहा या तालुक्यात पडला. पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले. अन्नधान्य व इतर वस्तू भिजून नुकसान झाले. घरातील विद्युत उपकरणांचेही नुकसान झाले. 273 घरांची पडझड होऊन लाखोंची हानी झाली आहे. पिकांचेही नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकरी, नुकसानग्रस्त नागरिक मोठ्या आर्थिक संकटाला बळी पडले आहेत. ही बाब शेतकरी कामगार पक्षाच्या निदर्शनास आली. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील तालुका चिटणीस, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नुकसानग्रस्तांची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
जिल्ह्यातील तालुका चिटणीस, महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली. शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते नुकसानग्रस्तांच्या भेटीला गेल्याने अनेक नुकसानग्रस्तांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
विजय गिदी यांच्याकडून निवेदन
रविवारी (दि.26) मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने तालुक्याला झोडपून काढले. अस्मानी संकटामुळे बहुतांशी गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. बऱ्याच घरांमध्ये पत्रे उडून नुकसान झाले. काहींची घरे जमीनदोस्त झाली. घरांमध्ये पाणी जाऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यामुळे गावांतील नागरिक, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी शेकाप तालुका चिटणीस विजय गिदी यांनी केली. याबाबत त्यांनी मुरूडचे तहसीलदार यांना निवेदन दिले.
अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाले. उन्हाळी भातशेतीचे नुकसान झाले. काही ठिकाणी दरडी कोसळल्या, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. घरांसह गुरांच्या गोठ्यांची पडझड झाली. या नुकसानीचे पंचनामे होणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने महसूल, कृषी, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदेश देऊन पंचनामे करून नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यासाठी सहकार्य करावे.
सुरेश खैरे,
जिल्हा चिटणीस, शेकाप
शेतकऱ्यांसह मच्छिमार, फळपीक उत्पादकांचे अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाळ्यापूर्वी मेअखेरपर्यंत घरांची देखभाल दुरुस्ती केली जाते. परंतु, अवकाळी पावसामुळे ही कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील शेतकरी, मच्छिमार, आंबा उत्पादक शेतकरी व नागरिकांना बसला आहे. खालापूरसह रायगड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळला. या पावसात मोठी हानी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले जाईल.
शिवानी जंगम,
जिल्हा महिला आघाडी प्रमुख, रायगड