| सुकेळी | वार्ताहर |
मुंबई -गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका काही केल्यास थांबता थांबत नसल्याचे चित्र सध्यातरी नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिसून येत आहे. दरम्यान रविवारी (दि.16) सुकेळी खिंडीतील खैरवाडी गावासमोरील वळणावरील सिमेंट टॅंकरला झालेला अपघात, नंतर मोटारसायकला झालेला अपघात समोर असतानाच शुक्रवार (दि.21) रोजी पहाटे3.30 वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कानसई गावा जवळील हॉटेल बिजली समोर महामार्ग लगत उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या डंपर ने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसली, तरी दोन्ही वाहनांचे मात्र नुकसान झाले आहे. तर या अपघातानंतर डंपर चालक तेथून पसार झाला आहे.
पोलिस ठाण्यातून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुंबई -गोवा महामार्गावर नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कानसई येथील हॉटेल बिजली समोर मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक चालकाने आपला ट्रक साईड पट्टीला सोडून उभा केला होता. यावेळी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास महाड बाजूकडून पनवेलकडे जाणाऱ्या अज्ञात डंपर चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. यावेळी डंपरचा समोरील भाग चेपला गेला मात्र, यावेळी या अपघातात डंपर चालकास कोणतीही दुखापत झाली नसून, अपघातानंतर अज्ञात डंपर चालकाने मात्र पळ काढला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र डंपर व ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान ट्रक चालकाच्या तक्रारीवरून नागोठणे पोलिस ठाण्यात अज्ञात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, नागोठणे पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पो.हवा. एस.एम.सावंत या पुढील तपास करीत आहेत.