एक विद्यार्थी बालसुधारगृहात तर दुसरा शिरसे गावातील
| कर्जत | प्रतिनिधी |
शाळेत गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या घटनेने कर्जत तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे. अपहरण करण्यात आलेला एक विद्यार्थी हा बालसुधारगृहात राहून शिक्षण घेत होता, तर दुसरा विद्यार्थी हा कर्जत तालुक्यातील शिरसे गावात राहणारा आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणार्या या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचे शाळेतून अपहरण करण्यात आले असल्याची नोंद कर्जत पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कर्जत दहीवली येथील बालसुधारगृहातील 12 वर्षीय तरुण विद्यार्थी आणि त्याचा मित्र यांना 19 मार्च रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास रायगड जिल्हा परिषदेची शाळा असलेली कर्जत दहीवली, निड येथे शिक्षण घेण्यासाठी म्हणून सोडण्यात आले होते. जिल्हा परीविक्षा अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षण गृह/बालगृह कर्जत येथील बालकल्याण समिती रायगड यांच्या आदेशाने काळजी व संरक्षणासाठी असलेला बालक म्हणून यातील एक विद्यार्थी शिक्षण घेत होता. तर, त्याचा मित्र दुसरा विद्यार्थी कर्जत येथील शिरसे गाव येथे राहणारा असून, तोदेखील 12 वर्षीय आहे. हे दोन्ही अल्पवयीन विद्यार्थी 19 मार्च रोजी शाळेत गेले होते. दरम्यान, शाळा सुटली त्यावेळी पालक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी शाळेत आले असता हे विद्यार्थी शाळेतच नसल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला होता. दोन्ही विद्यार्थी हे अल्पवयीन असल्याने त्यांचा अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्यांना फूस लावून कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे अपहरण केल्याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस शिपाई भागवत हे करीत आहेत.